बीपीएडची ६०, तर एमपीएडची ७५ हजारांत डिग्री मिळवा : शिवाजी विद्यापीठाचा थेट उल्लेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 05:17 PM2020-08-13T17:17:53+5:302020-08-13T17:20:18+5:30
बीपीएड, एमपीएड अभ्यासक्रमाच्या सन २०११ ते या वर्षापर्यंतच्या डिग्री (पदव्या) उपलब्ध आहेत. त्यांतील बी.पी.एड.ची डिग्री ६० हजार, तर एम.पी.एड.ची डिग्री ७५ हजार रुपयांत मिळेल. त्यासाठी संपर्क साधा, असे आवाहन नांदेडमधील असल्याचे सांगणाऱ्या एका युवकाने फेसबुकद्वारे केले आहे.
कोल्हापूर : बीपीएड, एमपीएड अभ्यासक्रमाच्या सन २०११ ते या वर्षापर्यंतच्या डिग्री (पदव्या) उपलब्ध आहेत. त्यांतील बी.पी.एड.ची डिग्री ६० हजार, तर एम.पी.एड.ची डिग्री ७५ हजार रुपयांत मिळेल. त्यासाठी संपर्क साधा, असे आवाहन नांदेडमधील असल्याचे सांगणाऱ्या एका युवकाने फेसबुकद्वारे केले आहे.
त्याबाबत सोशल मीडियावरून प्रसारित झालेल्या संदेशात शिवाजी विद्यापीठाचा थेट उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या संदेशातील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यास मी देत असल्याची डिग्री बनावट असल्याचे त्याच्याकडून सांगण्यात येत आहे.
फेसबुकवरील हा संदेश गेल्या काही दिवसांपासून अन्य सोशल मीडियावरून प्रसारितझाला आहे. त्यामध्ये सन २०११ पासूनच्या कालावधीतील बीपीएड, एम.पी.एड. डिग्री उपलब्ध आहेत. त्या देण्याचे काम ६० दिवसांमध्ये पूर्ण केले जाईल. अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन संबंधित युवकाने केले आहे.
हा संदेश मिळाल्यानंतर कोल्हापुरातील काही प्राध्यापक, विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी या युवकाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला, त्यावेळी त्याने माझ्या काही मित्रांची अडचण होती. त्यामुळे त्यांना मी अशी डुप्लिकेट डिग्री दिली आहे. तुम्हाला कशासाठी हवी आहे? तुम्हांला इंटरेस्ट असेल, तर कळवा, असे त्याने सांगितले आहे.
सोशल मीडियावरील या संदेशामध्ये शिवाजी विद्यापीठाचा थेटपणे त्याने उल्लेख केला आहे. हा संदेश सर्व स्पोर्टस ग्रुप, कोचेस आणि स्पोर्टसमनपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्याने केले आहे. त्याच्या या संदेशाने विद्यापीठाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. विद्यापीठ प्रशासनाने त्याबाबतच्या कारवाईचे पाऊल तातडीने उचलण्याची मागणी प्राध्यापक, अधिकाऱ्यांकडून होत आहे.
शिवाजी विद्यापीठाचे नाव वापरून डिग्रीबाबत कोणी सोशल मीडियाद्वारे आवाहन करीत असेल, तर त्याला विद्यार्थ्यांंनी बळी पडू नये. सावधगिरी बाळगावी. संबंधित युवकाने विद्यापीठाच्या नावाचा वापर केल्याचे दिसून आले आहे. त्याबाबत कुलसचिवांशी चर्चा करून पुढील कार्यवाही केली जाईल.
-डॉ. आर. व्ही. गुरव,
प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, शिवाजी विद्यापीठ
दिल्लीपर्यंत कनेक्शन
या संदेशाची माहिती परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. गुरव यांना दिल्यानंतर त्यांनी संबंधित युवकाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांनी स्वत:ची ओळख न सांगता त्याच्या संदेशाच्या अनुषंगाने चौकशी केली. त्यामध्ये त्या युवकाने देशातील कोणत्याही विद्यापीठाची बी.पी.एड., एम.पी.एड., नेट-सेट, पीएच.डी.ची डिग्री देऊ शकतो. त्याबाबत दिल्लीत कनेक्शन असून तेथील लोकांद्वारे काम होईल, असे त्याने सांगितल्याची माहिती डॉ. गुरव यांनी दिली.
अत्यंत गंभीर बाब
या प्रकरणात उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी प्रशासनास पत्र दिल्याचे समजले. त्याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी संबंधित बाब शिवाजी विद्यापीठाच्या पदवीशी निगडित आहे. तसेच ती अत्यंत गंभीर असल्याने आपण या संदेशाच्या प्रतीसह ही माहिती कुलसचिवांच्या निदर्शनास बुधवारी आणल्याचे त्यांनी सांगितले.