रक्कम मिळण्यास आॅक्टोबर उजाडणार?

By admin | Published: June 27, 2017 01:17 AM2017-06-27T01:17:12+5:302017-06-27T01:17:12+5:30

कर्जमाफीच्या याद्या निकषांनुसार : तपासण्यास तीन महिने; पात्र शेतकऱ्यांनाच लाभ देण्यासाठी सरकार आग्रही

To get the amount to be released on October? | रक्कम मिळण्यास आॅक्टोबर उजाडणार?

रक्कम मिळण्यास आॅक्टोबर उजाडणार?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क---कोल्हापूर : राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्याने शेतकऱ्यांसह विकास संस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होण्यास किमान तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. अद्याप कर्जमाफीचे निकष आलेले नाहीत. त्यानंतर निकषांनुसार याद्या तयार होणार, तपासण्या झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग केले जाणार आहेत. त्यामुळे थकबाकीदारांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास आॅक्टोबर महिना उजाडेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
दीड लाखापर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले. दीड लाखापेक्षा अधिक थकबाकीदारांबरोबरच नियमित कर्ज भरणाऱ्यांनाही राज्य सरकारने दिलासा दिला आहे.
जिल्हा बॅँकेशी संलग्न असणाऱ्या ४९ हजार शेतकऱ्यांचे १७३ कोटींचे कर्ज माफ होणार आहे. त्यामुळे शेतकरी, विकास संस्था व जिल्हा बॅँकेने नि:श्वास सोडला आहे; पण कर्जमाफीची घोषणा जूनमध्ये झाली असली तरी तिचे पैसे थकबाकीदाराच्या खात्यावर जमा होण्यास किमान तीन महिन्यांचा कालावधी जाणार आहे. केंद्र सरकारच्या कर्जमाफीत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचे सांगत कर्जमाफी खऱ्या थकबाकीदार शेतकऱ्यालाच मिळाली पाहिजे, यासाठी सरकार आग्रही असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफीत बोगसगिरी चालू देणार नसल्याचे संकेत सरकारने दिले आहेत.
कर्जमाफीची घोषणा करताना कोणाला लाभ मिळणार हेही सांगितले आहे. याबाबतचे सुस्पष्ट परिपत्रक अद्याप बॅँकांना उपलब्ध झालेले
नाही.
हे परिपत्रक आल्यानंतर विकास संस्थांकडून निकषपात्र शेतकऱ्यांच्या याद्या मागविल्या जाणार आहेत. या याद्या जिल्हा बॅँकेच्या यंत्रणेकडून तपासल्या जाणार आहेत. त्यानंतर सहकार विभागाच्या पातळीवरून तपासणी होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे याद्या, तपासण्या व अंतिम यादी यांसाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी जाईल, अशी शक्यता बॅँकिंग क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.


आधी खात्री, मगच पैसे जमा?
कर्जमाफीच्या संपूर्ण निकषांचे काटेकोर पालन करणाऱ्या थकबाकीदारांनाच लाभ झाला पाहिजे, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे निकष व त्यानुसार पात्र शेतकऱ्यांची संख्या अंतिम केली जाणार आहे. यासाठी सहकार खात्याच्या वतीने विशेष तपासणी यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
रिझर्व्ह बॅँकेच्या परिपत्रकाकडे नजरा
जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास केंद्रीय अर्थ विभागाने परवानगी दिली आहे; पण आदेश देऊन आठ दिवस उलटले तरी जिल्हा बॅँकांनी पैसे कोठे भरायचे याबाबत स्पष्टता नसल्याने गोंधळ आहे. शनिवार (दि. २४) पासून तीन दिवस रिझर्व्ह बॅँकेला सुटी असल्याने आज, मंगळवारी काहीतरी निर्णय होईल, असा अंदाज असल्याने रिझर्व्ह बॅँकेच्या परिपत्रकाकडे नजरा लागल्या आहेत.

Web Title: To get the amount to be released on October?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.