‘प्रादेशिक योजना’ लवकर मंजूर करा
By admin | Published: May 17, 2017 12:36 AM2017-05-17T00:36:47+5:302017-05-17T00:36:47+5:30
आराखडा दोषरहित असावा : असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस्च्या बैठकीत मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : त्रुटींची पूर्तता करून कोल्हापूरच्या प्रादेशिक योजनेचा आराखडा लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा, अशी मागणी असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अॅँड इंजिनिअर्स, कोल्हापूरच्या बैठकीत मंगळवारी करण्यात आली.
असोसिएशनच्या कार्यालयात ही बैठक झाली. प्रादेशिक योजना प्रत्यक्षात राबविताना शाखा कार्यालय आणि अभियंते यांना अनेक त्रुटी व अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. असोसिएशन या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील प्रादेशिक योजनेचा आराखडा दोषरहित असावा, हा असोसिएशनचा उद्देश आहे. त्यासाठी जिल्ह्यातील विविध आर्किटेक्टस असोसिएशनची संयुक्त बैठक घेण्यात आली.
नियोजन मंडळाने दि. २८ मार्च २०१७ रोजी अंतिम बैठक घेऊन योजनेचा आराखडा शासनास सादर करण्यासाठी मंजुरी घेतली. यावेळी पालकमंत्री, लोकप्रतिनिधी आणि नियोजन मंडळाचे अध्यक्ष यांना नागरिकांच्या तक्रारींची दखल घेणे भाग पडले. यावर दोन दिवसांत त्रुटी दुरुस्त करून शासनाला आराखडा सादर करण्याच्या अटीवर ३१ मार्च रोजी मंजुरी देण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात २४ एप्रिलअखेर फक्त कव्हरिंग लेटरव्यतिरिक्त कोणतेही नकाशे, शिफारशी या शासनाला पोहोचलेल्या नव्हत्या.
याबाबतची माहिती शासनाकडून उपलब्ध झाली आहे. आराखड्यास अंतिम मंजुरी मिळण्यापूर्वी तो नगररचना संचालक यांच्याकडे छाननीसाठी पाठविला जातो. जिल्ह्यातील असोसिएशन्सनी एकत्रित येऊन पुणे येथील नगररचना संचालक यांच्यासमवेत बैठक नियोजित केली आहे. यामध्ये प्रामुख्याने त्रुटी दूर करून लवकर आराखडा मंजूर करावा, असा आग्रह धरण्यात येणार आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने वेळीच दखल घेऊन आराखड्यामधील त्रुटींची शहानिशा करावी, अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अॅँड इंजिनिअर्स, कोल्हापूरचे अध्यक्ष सुधीर राऊत यांनी दिली. या बैठकीस असोसिएशनचे माजी अध्यक्ष संदीप घाटगे, रवी पाटील, अतुल शिंदे, सचिन चव्हाण, बाजीराव भोसले, अजित उत्तूरकर, गडहिंग्लज असोसिएशनचे अध्यक्ष शैलेंद्र कावणेकर, आदींसह जयसिंगपूर, हुपरी, शिरोळ, आजरा येथील असोसिएशनचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
‘विकासासाठी कटिबद्ध
असोसिएशन व नागरिकांनी हरकतीवेळी मांडलेल्या मुद्द्यांवरील शिफारशी, आराखड्यामधील त्रुटी दुरुस्त केलेले नकाशे प्रादेशिक योजना कार्यालयाकडून मागूनही मिळत नाहीत. याचा विचार करता प्रादेशिक योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकता दिसून येत नाही. जिल्ह्यातील सर्व आर्किटेक्टस, इंजिनिअर्स असोसिएशन्स या विकासासाठी कटिबद्ध आहेत. त्रुटींबाबत विरोध असून दोषविरहित आराखडा स्वागतार्ह असल्याची माहिती असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अॅँड इंजिनिअर्स, कोल्हापूरचे अध्यक्ष राऊत यांनी दिली.एक खिडकी’चा प्रभावी अंमल करावा
असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अॅँड इंजिनिअर्स, कोल्हापूरच्या शिष्टमंडळाने महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची सदिच्छा भेट घेतली. बांधकाम परवानगीसाठीच्या एक खिडकी योजनेचा प्रभावी अंमल करावा. नगररचना विभागात आर्किटेक्टस्, इंजिनिअर्स कक्ष मिळावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. याबाबत सकारात्मक विचार करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन आयुक्त डॉ. चौधरी यांनी दिले. शिष्टमंडळात असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर राऊत, सुनील मांजरेकर, अतुल शिंदे, माजी अध्यक्ष बलराम महाजन, मोहन वायचळ, उमेश यादव, रवी पाटील, विजय चोपदार, आदींचा समावेश होेता.