येणे कोट्यवधींचे; शाश्वती काही लाखांची
By admin | Published: April 24, 2017 01:08 AM2017-04-24T01:08:23+5:302017-04-24T01:08:23+5:30
येणे कोट्यवधींचे; शाश्वती काही लाखांची
वस्त्रनगरीत खळबळ : दिवाळे प्रकरणाने इचलकरंजीतील यंत्रमागधारक हवालदिल; बालोत्रा येथे तलेसरा याचा मागोवाच नाही
इचलकरंजी : पॉपलीन कापड अडत व्यापारी तलेसरा याने वस्त्रनगरीच्या इतिहासातील विक्रमी दिवाळे काढले असले तरी तलेसरा बंधूंचा राजस्थान-बालोत्रा येथे मागोवा घेण्यासाठी गेलेल्या यंत्रमाग कारखानदारांना प्रत्यक्षात काहीच मिळत नसल्याने कारखानदार हवालदिल झाले आहेत. कापड खरेदी-विक्रीतील कोट्यवधी रुपयांचे येणे आणि प्रत्यक्षात काही लाखांची मालमत्ता अशा विचित्र कोंडीत यंत्रमागधारक अडकले आहेत.
इचलकरंजी शहरामध्ये यापूर्वी काही लाखांचे व काही कोटी रुपयांचे दिवाळे काढण्याचे प्रकार झाले आहेत. साधारणत: १५ कोटी रुपयांपर्यंत दिवाळे काढण्याची यापूर्वीची नोंद आहे. पॉपलीन कापडाच्या खरेदी-विक्रीमध्ये अडत व्यापारी तलेसरा याने साधारणत: साठ कोटी रुपयांपर्यंतचे दिवाळे काढल्यामुळे मागील आठवड्यात वस्त्रनगरीमध्ये मोठी खळबळ उडाली. या व्यवहारामध्ये शेकडो यंत्रमाग असलेल्या यंत्रमाग कारखानदारांपासून ते आॅटोलूम कारखानदारांपर्यंत सुमारे शंभरांहून अधिक उद्योजक अडकले आहेत. मोठ्या कारखानदारांचे कोट्यवधी रुपये, तर लहान यंत्रमागधारकांचे काही लाख रुपये तलेसरा यांच्याकडे अडकून पडले. एकूणच या व्यवहाराची व्याप्ती पाहता वस्त्रनगरीतील कापड बाजार हादरून गेला.
अशा परिस्थितीमध्ये नाट्यगृह चौकात असलेल्या तलेसरा यांच्या व्यापारी पेढीचा कापड माल बालोत्राला पाठविण्यासाठी एका वाहतूकदार कंपनीमार्फत रवाना होत होता. या वाहतूकदार कंपनीमध्ये संबंधित कारखानदारांच्या नावावर जमा झालेल्या कापडाच्या गाठी नगरसेवक सागर चाळके व संजय तेलनाडे यांच्या पुढाकाराने परत करण्याचे काम करण्यात आले. ज्यामुळे सुमारे ५० लाख रुपयांच्या कापड गाठी परत मिळाल्याने संबंधित यंत्रमागधारकांमध्ये फसवणुकीतून सुटल्याचे समाधान व्यक्त झाले.
अशा प्रकारे तलेसरा यांच्या दिवाळे प्रकरणात अडकलेल्या यंत्रमागधारकांनी गत सप्ताहामध्ये बालोत्रा गाठले. अशांची संख्या तीस असून, त्यामध्ये पाच दलालांचाही समावेश आहे. तेथे गेलेले यंत्रमाग कारखानदार तलेसरा बंधूंचा शोध घेत असले तरी ते प्रत्यक्षात मिळून येत नाहीत. त्यामुळे त्यांच्यातील अस्वस्थता वाढली आहे. तलेसरा यांचे एक नातलग तेथे मिळून आले असल्याने ‘बुडत्याला काडीचा आधार’ याप्रमाणे त्यांच्याबरोबर यंत्रमागधारक चर्चा करीत आहेत. कोट्यवधी रुपयांचे कापड या यंत्रमागधारकांनी तलेसरा यांना दिले आहे. मात्र, तलेसरा यांची फ्लॅट किंवा प्लॉट अशी काही लाखोंची असलेली मालमत्ता विकून कारखानदारांचे पैसे भागविण्याची भाषा केली जात आहे. पण, कोट्यवधी रुपयांची रक्कम येणी असून, प्रत्यक्षात मात्र काही लाखांची मालमत्ता विकून पैसे कसे मिळणार ? अशी विचित्र कोंडी निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
पेमेंटधारेतील ३५ कोटींचे झाले काय ?
१ इचलकरंजी येथील कोट्यवधी रुपयांचे पॉपलीन कापड पुढील प्रक्रियेसाठी दररोज बालोत्रा येथे जाते. त्यातील बहुतांश कापड तलेसरा यांच्याकडून खरेदी करून पाठविले जात असे. यंत्रमागधारकांकडून घेतलेल्या कापडाचे पेमेंट साधारणत: ३५ दिवसांनी दिले जात असे.
२ अशा प्रकारे खरेदी केलेल्या यंत्रमागधारकांना तलेसराकडून सरासरी सव्वा कोटी रुपयांचे पेमेंट परत दिले जात असे. बालोत्रा येथे मात्र प्रत्येक आठवड्याला पेमेंट करण्याची पद्धती आहे. अशा
प्रकारे आठवड्याला साधारणत: नऊ कोटी रुपयांचे पेमेंट तलेसरा करीत असत.
३ मात्र, त्यांना प्रत्येक आठवड्याला पेमेंट मिळत असल्याने सात दिवसांपासून ते ३५ दिवसांपर्यंत म्हणजे २८ दिवसांचे बालोत्रा येथे मिळणाऱ्या पेमेंटचे ३५ कोटी रुपये तलेसरा वरच्यावर वापरीत असे. अशा परिस्थितीमध्ये ३५ कोटी रुपयांचे झाले काय ? याबाबतही गूढ निर्माण झाले आहे.