पश्चिमेची तटबंदी उतरुन घ्या
By admin | Published: February 14, 2015 12:01 AM2015-02-14T00:01:43+5:302015-02-14T00:06:43+5:30
इंजिनिअर्स अॅन्ड आर्किटेक्ट असो.ची सूचना : रंकाळ्यासाठी ‘अल्सर पद्धतीची नवी भिंत बांधावी, निविदा काढणार
कोल्हापूर : रंकाळ्याच्या पश्चिम बाजूची ९० मीटरची तटबंदी कोणत्याही वेळी ढासळू शकते. ही संपूर्ण तटबंदी काढून कॉँक्रीटची भक्कम भिंत उभारणे व त्यापुढे जुन्या ‘अल्सर’ पद्धतीने उतरंडीसारखी दगडी भिंत उभारण्याचा पर्याय इंजिनिअर्स अॅन्ड आर्किटेक्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना सूचविला. नव्या व जुन्या तंत्रज्ञानानुसार होणाऱ्या या १ कोटी १० लाख रुपयांच्या कामासाठी अल्पकाळाची निविदा काढून तत्काळ काम सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.इंजिनिअर्स अॅन्ड आर्किटेक्ट असोसिएशनच्या सदस्यांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह सकाळी साडेनऊ ते बारा वाजेपर्यंत पाहणी केली. यावेळी पश्चिम भागातील तटबंदी कोसळण्याची कारणे व पर्यायी तटबंदी कशा पद्धतीने उभी करावी, याचे सदस्यांनी अभ्यासपूर्ण सर्वेक्षण केले. रंकाळ्याच्या टॉवरखाली दलदल झाली असून, येथे तत्काळ क ॉँक्रिटचे मजबूतीकरण करण्याची गरज असल्याचे सदस्यांनी नमूद केले. अन्यथा टॉवर पडण्याचा धोका असल्याची सूचना केली.
यापुढेही रंकाळा दुरुस्तीच्या कामात असोसिएशन वेळोवेळी सहकार्य करेल, असे आश्वासन असोसिएशनचे अध्यक्ष संदीप घाटगे यांनी दिले. यावेळी असो.चे सदस्य सुधीर राऊत, शिवाजी पाटील, मिलींद नाईक, मोहन वायचळ, रवी पाटील, उमेश कुंभार, सुनील मांजरेकर, सूरज जाधव, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आयुक्तांच्या सूचना
आर्किटेक्ट असो.च्या सूचनांप्रमाणे रंकाळ्याची उर्वरित तटबंदी केव्हाही कोसळू शकते. तत्पूर्वी ही संपूर्ण तटबंदी हटवावी.
झाडांच्या मुळांचा धोका भिंतीला होऊ नये, यासाठी भक्कम कॉँक्रिटची भिंत बांधावी.
त्यापुढे जुन्या पध्दतीने दगडी भिंत उभारावी. ही भिंत धरणाच्या सांडव्याप्रमाणे उतरती असावी,
या सर्व कामाची तत्काळ सुरुवात करण्यासाठी निविदा काढण्यात येईल, असे आयुक्तांनी आदेश दिले.