संशोधनासाठी ‘केआयटी’चे प्राध्यापक, विद्यार्थ्यांना मिळणार साहाय्य
By Admin | Published: July 4, 2017 06:39 PM2017-07-04T18:39:54+5:302017-07-04T18:39:54+5:30
सांगलीच्या ‘समृद्धी फाउंडेशन’समवेत करार; कौशल्य विकासाचे प्रशिक्षण
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0४ : येथील कोल्हापूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे अभियांत्रिकी महाविद्यालय (केआयटी) आणि सांगलीतील समृद्धी टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेशन (टीबीआय) फाउंडेशन यांच्यात मंगळवारी केआयटी येथे सामंजस्य करार झाला. या करारामुळे ‘केआयटी’मधील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्या संशोधनासाठी तांत्रिक साहाय्य व आर्थिक निधी मिळणार आहे.
या करारामुळे विद्यार्थ्यांच्या छोट्या संशोधनापासून ते प्राध्यापकांच्या कल्पक, मोठ्या संशोधनासाठी आर्थिक सल्ला व मदत, औद्योगिक व कायदेशीर सल्ला, संशोधन व विकास, विक्री-सेवा, आदींची उपलब्धता होणार आहे. विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
पदवीनंतर विविध कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करता येणार आहे. त्यासाठी ‘केआयटी’कडून आवश्यक असणारी जागा व मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. या करारावेळी समृद्धी फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक ज्योती यादव, प्रतिनिधी नरेंद्र आंबी, ‘केआयटी’चे संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी, संशोधन आणि विकास अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, राजेंद्र हेद्दूर उपस्थित होते.
संशोधनाला पाठबळ
अभियांत्रिकी क्षेत्रात दिवसेंदिवस नवतंत्रज्ञानाची भर पडत आहे. प्राध्यापक, विद्यार्थ्यांच्या कल्पना व संशोधन बऱ्याच वेळा योग्य मार्गदर्शन, तांत्रिक साहाय्य व आर्थिक निधी, आदींमुळे अपुरे राहते. ‘केआयटी’चे प्राध्यापक, विद्यार्थ्यांची ही अडचण दूर करण्याच्या अनुषंगाने समृद्धी फाउंडेशनसमवेतचा करार महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे ‘केआयटी’चे संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी यांनी सांगितले. ते म्हणाले, या करारामुळे ‘केआयटी’मधील संशोधन परंपरेला पाठबळ मिळणार आहे. ‘केआयटी’चे अध्यक्ष सचिन मेनन, उपाध्यक्ष भरत पाटील, सचिव साजिद हुदली यांच्यासह संचालकांचे मार्गदर्शन लाभले.
कोल्हापुुरात मंगळवारी केआयटी कॉलेज व सांगलीतील समृद्धी टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्युबेशन फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार झाला. या कराराची प्रत समृद्धी फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक ज्योती यादव यांनी ‘केआयटी’चे संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी यांना दिली. यावेळी शेजारी डॉ. एस. एम. पिसे, राजेंद्र हेद्दूर, आदी उपस्थित होते.