स्वत:च्या क्षमतांची ओळख करून घ्या...
By admin | Published: July 22, 2014 11:42 PM2014-07-22T23:42:55+5:302014-07-23T00:05:44+5:30
वारणा वडगावकर : ‘सखीं’साठी व्यक्तिमत्त्व विकासाचा कानमंत्र
कोल्हापूर : ‘स्वत:च्या क्षमतांची ओळख करून घेत स्वत:मधील उणिवा शोधा,’ असे प्रतिपादन वारणा वडगावकर यांनी सखींना ‘ओळख माझी माझ्याशी’ या व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रमात केले. लोकमत सखी मंचच्या वतीने कोरगावकर लॉन, टाकाळा येथे सोमवार, २१ जुलै रोजी व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रमाचे दुपारी बारा ते तीन या वेळेत आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.
‘स्वत:ला आहे तसे स्वीकारणे महत्त्वाचे आहे. जाणीवपूर्वक एक पाऊल रोज पुढे टाकले तर आपले ध्येय साध्य करता येते. रोज स्वत:साठी आणि इतरांसाठी एकच छोटी गोष्ट करा. आपल्या वेळेचे नीट नियोजन करा.’ अशा टिप्स देत वारणा वडगावकर यांनी सखींना हसत-खेळत व्यक्तिमत्त्व विकासाचा कानमंत्र दिला. कार्यक्रमासाठी गोविंदराव कोरगावकर धर्मादाय संस्थेचे सहकार्य लाभले.
सुरुवातीला ‘लोकमत’चे संस्थापक, संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन गोविंदराव कोरगावकर धर्मादाय संस्थेच्या संचालिका पल्लवी कोरगावकर, उद्योजिका संध्या कुंभारे आणि वारणा वडगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. पल्लवी कोरगावकर यांनी सखींना स्वत:वर विश्वास ठेऊन प्रगती करण्याचा सल्ला दिला. संध्या कुंभारे यांनी महिलांनी चूल आणि मूल या जबाबदाऱ्यांचा बाऊ न करता ध्येय गाठण्याचा सल्ला दिला.
सखी मंच संयोजिका प्रिया दंडगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी सखी मंच संयोजन समिती सदस्य राधिका कुलकर्णी, शोभा वोरा, दीप्ती सासने उपस्थित होत्या.
यावेळी हॉटेल करवीर रियासत यांच्यावतीने उपस्थित सखींमधून लकी ड्रॉ श्रेयस तळपदे, नेहा जोशी आणि दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते काढण्यात आला. दोन विजेत्यांना हॉटेल करवीर रियासतकडून जेवणाचे कूपन देण्यात आले. (प्रतिनिधी)