संघटित व्हा, अन्यायाविरोधात लढा द्या
By admin | Published: January 29, 2015 12:00 AM2015-01-29T00:00:27+5:302015-01-29T00:16:59+5:30
‘छेडछाड का ?’ : तरुणींवरील अत्याचाराविरोधात महिला फेडरेशनतर्फे जनजागृती
कोल्हापूर : महिला, युवतींवरील अत्याचार दिवसें-दिवस वाढत आहेत. ते थांबविण्यासाठी अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. त्यासाठी समाजातील प्रत्येकाने पहिल्यांदा माणूस बनावे, संघटित व्हावे आणि अन्यायाविरोधात लढा द्यावा, असा संदेश आज, बुधवारी नाटकातून तरुण-तरुणींना दिला.
भारतीय महिला फेडरेशनतर्फे ‘छेडछाड का? ’ या नाटकाचा प्रयोग शिवाजी विद्यापीठातील लोककला केंद्रात झाला. दीक्षान्त समारंभाच्या पार्श्वभूमीवर हे नाटक आयोजित केले होते. नाटकाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, ग्रंथपाल डॉ. नमिता खोत, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड, पी. व्ही. बिलावर आदी उपस्थित होते. समाजात सध्या छेडछाडीचे प्रकरणांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, त्याकडे समाज गांभीर्याने पाहत नसल्याचे वास्तव आहे. तरुणींची छेडछाड आणि हिंसा या गंभीर घटना आहेत. त्याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी व अशा प्रवृत्तींविरोधात सध्या समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला नाही घाबरत, तुम्ही निर्भयपणे पोलिसांत तक्रार द्या, गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. त्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांना वठणीवर आणले पाहिजे तरच,अत्याचारीत मुलीला न्याय मिळेल असा संदेश देत तरुण-तरुणींनी ‘मी गप्प बसणार नाही व छेडछाडीला विरोध करेन,अशी शपथ नाटकाच्या माध्यमातून घेतली. नाटकात दीपा सुतार, मानसी पळशीकर, सागर खुर्द, प्रसाद महेकर, प्रशांत सुतार, विठ्ठल माधव, विजय कुरणे, श्रद्धा गायकवाड, प्रियांका राऊत यांनी उत्कृष्टपणे सादरीकरण केले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. दरम्यान, नाटक संपल्यानंतर कुलगुरू डॉ. पवार यांच्या हस्ते फेडरेशनच्या जिल्हा अध्यक्षा डॉ. मेघा पानसरे यांचा सत्कार करण्यात आला. नाटक पाहण्यासाठी उपस्थित असलेल्यांपैकी काहींनी कलाकारांची भेट घेऊन आपल्याला तसेच त्यांच्याशी संबंधित तरुणी, महिलांना आलेले अनुभव सांगितले. (प्रतिनिधी)
जागृतीचे प्रभावी माध्यम...
महिला, तरुणींवरील अन्यायाविरोधात समाजात जागृती करण्यासाठीचे ‘छेडछाड का ?’ हे नाटक प्रभावी ठरणारे माध्यम असल्याचे कुलगुरू डॉ. पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, सध्या समाजातील गंभीर विषय या नाटकातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. तरुण-तरुणींनी उत्तमपणे अभिनयाचे सादरीकरण केले.