एकचा क्वॉईन टाका, ई टॉयलेटमध्ये जावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:29 AM2018-02-15T00:29:44+5:302018-02-15T00:30:14+5:30
शेखर धोंगडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : रस्त्यावर कोणीही उघड्यावर शौचास बसू नये, तसेच होणाºया दुर्गंधी व प्रदूषणामुळे सर्वांचे आरोग्य सुरक्षित रहावे यासाठीच स्वच्छ भारत अभियानअंतर्गत आता ‘एक रुपयाचे क्वाईन टाका व अत्याधुनिक अशा ई टॉयलेट’ सुविधेचा वापर करा, असे आवाहन शासनपातळीवरून होत आहे. त्यास प्राथमिक स्तरावर शहरी भागातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, याची मागणीही वाढत असल्याचे दिसून येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ई टॉयलेट ही संकल्पना देशातील प्रत्येक गावा-गावांत राबविण्यात येत आहे. येत्या चार वर्षांत सिमला ते कन्याकुमारी व गुजरात ते आसामपर्यंत ई टॉयलेट सुविधा देण्यात येणार आहे.
भारतात तमिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेशसह महाराष्ट्रात नवी मुंबई, महाबळेश्वर, पाचगणी, सोलापूर येथे ई टॉयलेट येथे ही सुविधा आहे.
कोल्हापूर येथे रुईकर कॉलनी, मेरी वेदर ग्राऊंड, बिंदू चौकानजीक, ताराबाई गार्डन अशा चार ठिकाणी ही सुविधा सुरू झाली आहे. महापालिकेच्या सूचनेनुसार आणखी काही ठिकाणी ई टॉयलेट सुविधा सुरू केली जाणार आहे.
सातारा, सासवड, अकोला, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, कल्याण-डोेंबिवली तसेच पुणे येथे स्मार्ट सिटीअंतर्गत येत्या काही महिन्यांत ही सुविधा सुरू होईल, असे ईराम सांयटिफिक सोल्यूशन कंपनीतर्फे सांगण्यात आले. पहिले सहा महिने ते एक वर्ष कंपनीकडून दुरुस्ती व स्वच्छतेची सेवा मोफत पुरविली जाईल. त्यानंतर मात्र ठराविक रक्कम घेऊन स्वच्छता व दुरुस्तीची जबाबदारी कंपनीकडेच राहील.
ई टॉयलेट वापरण्याची
पद्धत व सुविधा
संपूर्ण स्टेनलेस स्टील बॉडी व अत्याधुनिक व जीपीएस यंत्रणा बसवलेले हे ई टॉयलेट १ रुपयाचे कॉईन टाकल्यानंतर दरवाजा उघडला जातो. आत गेल्यानंतर पाण्याची योग्य सुविधा, स्वच्छतेची पूरेपुर काळजी घेण्याबरोबरच युपीएस, लाईट, आवश्यक तितके पाणी व बचत यांचा मेळ घालण्यात आला आहे. येथे लोकेशन, तक्रारीही नोंदविता येणार आहे. महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन व्हेडिंग मशीनचीही सुविधा दिली आहे.
वैशिष्ट्ये
इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा वापर व सेन्सर, एलईडी अशा विविध सुविधा ई-टॉयलेटमध्ये उपलब्ध आहेत.
युपीएस बॅटरीची सुविधा
चार तासांत संपूर्ण स्वच्छता
दररोज ५० ते ७० लोकांना वापरण्यास योग्य
पाण्याच्या बचतीचाही यात विचार केला आहे.