वृक्ष लागवडीची शास्त्रशुद्ध माहिती मिळवा ऑनलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:24 AM2021-05-26T04:24:12+5:302021-05-26T04:24:12+5:30
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय स्थानिक फळे व भाज्या संवर्धन वर्षाचे निमित्त साधून वृक्ष लागवडीच्या शास्त्रशुद्ध माहिती देण्यासाठी कोल्हापुरातील निसर्गमित्र परिवाराने ...
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय स्थानिक फळे व भाज्या संवर्धन वर्षाचे निमित्त साधून वृक्ष लागवडीच्या शास्त्रशुद्ध माहिती देण्यासाठी कोल्हापुरातील निसर्गमित्र परिवाराने एका अनोख्या ऑनलाइन उपक्रमाचे आयोजन केले आहे. या अंतर्गत रोपवाटिका निर्मिती व व्यवस्थापन, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व संरक्षण याविषयी "प्रश्न तुमचे उत्तर आमचे" ही ऑनलाइन स्पर्धा ३१ मे २०२१ रोजी घेण्यात येणार आहे, या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन निसर्गमित्र परिवाराने केले आहे.
नागरी वस्तीत व वनक्षेत्र परिसरात कोणकोणत्या प्रकारचे वृक्ष आहेत, त्यापैकी कोणत्या वृक्षांची लागवड करणे आवश्यक आहे, रोपांची निवड कशी करावी, रोपे कशी तयार करावीत, रोपवाटिकेचे व्यवस्थापन, तयार झालेल्या रोपांची लागवड केव्हा व कशी, तसेच वृक्ष संगोपन आणि संवर्धन कसे करावे, या विषयीची शास्त्रीय माहिती सहज उपलब्ध व्हावी, वृक्षप्रेमींची संख्या वाढावी व त्यायोगे वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात होऊन पर्यावरणीय समस्या कमी होण्यासाठी मदत व्हावी, या हेतूने यासाठी निसर्ग मित्र परिवाराने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
“प्रश्न तुमचे उत्तर आमचे' अशी ही ऑनलाइन स्पर्धा दिनांक ३१ मे २०२१ रोजी दुपारी ४ ते ७ या वेळेत होणार असून, यावेळी संस्थेचे अध्यक्ष व वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर मार्गदर्शन करणार आहेत. निसर्गप्रेमींनीं व्हाॅॅट्सअप, फेसबुक, मोबाइल फोनच्या माध्यमातून संवाद साधावा व जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन निसर्ग मित्र संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले यांनी केले आहे.
२९ मे पर्यंत पाठवा आपले प्रश्न
निसर्गप्रेमींनी आपले प्रश्न २९ मे २०२१ पर्यंत निसर्गमित्र परिवाराचे अध्यक्ष, डॉ. मधुकर बाचुळकर (९७३०३३९९६६८) आणि कार्यवाह, अनिल चौगुले (९४२३८५८७११ आणि ९८६०५०७८७३) यांच्याशी व्हाॅट्सअप किंवा फोन करून कळवावेत, या प्रश्नांची उत्तरे वनस्पती तज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर ३१ मे रोजी ४:३० ते ६:३० या वेळेत गुगल मिटच्या माध्यमातून ऑनलाइन संवादातून देण्यात येणार आहेत. याविषयीचे मार्गदर्शक पुस्तक डॉ. मधुकर बाचुळकर लिखित "वृक्षरोपवाटिका, वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन" हे पुस्तक निसर्ग मित्र संस्था ५ जून (पर्यावरण दिन) पर्यंत प्रकाशित करीत आहे.
(बातमीदार : संदीप आडनाईक)