पावसाळ्यापूर्वी शक्य ती कामे पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:31 AM2021-06-16T04:31:06+5:302021-06-16T04:31:06+5:30
कोल्हापूर : पावसाळ्यापूर्वी जोपर्यंत थेट पाइपलाइन व अमृत योजनेची कामे काम करता येणे शक्य आहे तोपर्यंत मनुष्यबळ व यंत्रसामग्री ...
कोल्हापूर : पावसाळ्यापूर्वी जोपर्यंत थेट पाइपलाइन व अमृत योजनेची कामे काम करता येणे शक्य आहे तोपर्यंत मनुष्यबळ व यंत्रसामग्री वाढवून जास्तीत जास्त कामे करून घ्या, अशा स्पष्ट सूचना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
प्रशासक बलकवडे यांनी थेट पाइपलाइन योजना, अमृत योजनेअंतर्गत शहर पाणी पुरवठा योजना व मलनिस्सारण योजनांच्या कामाचा आढावा मंगळवारी घेतला. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जलअभियंता अजय साळुंखे, जल अभियंता (प्रकल्प) हर्षजित घाटगे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे शाखा अभियंता भास्कर कुंभार, शाखा अभियंता आर. के. पाटील, संजय नागरगोजे, ठेकेदार दास ऑफशोअरचे प्रतिनिधी सोनवणे व नोबल कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रतिनिधी मदने, सल्लागार प्रतिनिधी विजय मोहिते उपस्थित होते.
विद्युत वाहिनी टाकण्याचे काम महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत फिरती करून तातडीने सुरू करा. ब्रेक प्रेशर टॅकचे काम पावसाळ्यात सुरू ठेवा. पाइपलाइनवरील व्हॉल्वची जागा महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत फिरती करून निश्चित करा. सोळांकूर येथील पाइपलाइनचे काम सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
जल अभियंता (प्रकल्प) हर्षजित घाटगे यांनी योजनेतील झालेल्या व प्रलंबित असलेल्या कामाची माहिती दिली. तर ठेकेदार दास ऑफशोअर यांनी अमृत योजनेच्या केलेल्या कामाची माहिती प्रशासकांना दिली. यानंतर प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी ठेकेदाराने कामाची गती वाढविणे आवश्यक असून त्याकरीता मनुष्यबळ व यंत्रसामुग्री वाढविण्याच्या सूचना दिल्या. पावसाळयामध्ये उंच टाक्यांची कामे, वितरण नलिका टाकणे, रस्ते रिस्टोरेशन करणे ही कामे करा. काम करताना नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन सुरक्षिततेचे सर्व निकष पाळून विहीत मुदतीत कामे पूर्ण करण्याच्या सूचना बलकवडे यांनी दिल्या.