एकत्र येण्यासाठी मंदिर हे केंद्र बनवा:चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:25 AM2018-12-31T00:25:34+5:302018-12-31T00:25:38+5:30
कोल्हापूर : विधायक कार्य, समाजाच्या भल्यासाठी एकत्र या. एकत्र येण्यासाठी मंदिर हे केंद्र बनवा. आपल्या कॉलनीत मंदिर असल्यास ते ...
कोल्हापूर : विधायक कार्य, समाजाच्या भल्यासाठी एकत्र या. एकत्र येण्यासाठी मंदिर हे केंद्र बनवा. आपल्या कॉलनीत मंदिर असल्यास ते अधिक चांगले करा. नसल्यास लोकभावना लक्षात घेऊन मंदिर उभा करा. त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत मी करेन, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे केले.
येथील भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या माध्यमातून आयोजित ‘नवऊर्जा महोत्सवा’च्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. निर्माण चौकात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवाचा रविवारी रात्री श्री दत्तगुरूंच्या ३३ फुटी मूर्तीसमोर आरती करून समारोप झाला. यावेळी अंजली पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूरचे पर्यटन वाढविण्याच्या उद्देशाने हा महोत्सव घेण्यात आला. त्याला सुमारे आठ लाख जणांनी भेट दिली. त्यातील साधारणत: चार लाख बाहेरील पर्यटक होते. परमेश्वर मानणाऱ्यांसाठी एक माध्यम म्हणून हा उत्सव कामी आला. पोटाची भूक पूर्ण झाल्यानंतर मनाची भूक भागविण्यासाठी असे महोत्सव, कार्यक्रम शासन आणि विविध संस्थांनी घ्यावेत. समाजाच्या भल्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. त्यातून एक सकारात्मक दबाव निर्माण होतो. एकत्र येण्यासाठी मंदिर हे केंद्र बनवा.
या कार्यक्रमात राहुल चिकोडे यांनी महोत्सवाचा आढावा घेतला. चारुदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, महोत्सवात दुपारी राजेंद्र मेस्त्री आणि सहकाºयांनी ‘नाद सुरमयी’ हा कार्यक्रम सादर केला. राम सारंग, रवींद्र जोशी, मेधप्रणव पोवार, करण चव्हाण, विक्रम पाटील, महेश बगाडे, शिवतेज पाटील, तृप्ती पाटील, श्रीराज भोसले, आदित्य सवळकर, पूर्वा कोडोलीकर यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे उज्ज्वल नागेशकर, सचिन शानबाग, देवल क्लबचे कार्यवाह सचिन पुरोहित, अॅड. धनंजय पठाडे यांचा सत्कार करण्यात आला. ‘मामाच्या गावाला जाऊया’ निबंध स्पर्धेतील विजेते वैष्णवी कबेळकर, आर्य नलवडे, तेजस्विनी माळी, श्रावण पोवार, चेतन पाटील, वरद घोडके यांना बक्षिसे देण्यात आली. सार्थक क्रिएशनच्या कलाकारांनी नवऊर्जा गाण्यावर नृत्याविष्कार सादर केला. संग्राम पाटील यांनी मराठी सिनेगीते सादर केली. या महोत्सवाला नागरिक, पर्यटकांचा उदंड प्रतिसाद लाभला.