लस घ्यायचीय...ऑनलाईन नोंदणी करून तारीख, वेळ घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:25 AM2021-04-28T04:25:52+5:302021-04-28T04:25:52+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात उपलब्ध होणारी लस आणि लाभार्थ्यांची होणारी गर्दी, नाहक होणारा त्रास टाळण्यासाठी आता यापुढे ज्यांना ...
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात उपलब्ध होणारी लस आणि लाभार्थ्यांची होणारी गर्दी, नाहक होणारा त्रास टाळण्यासाठी आता यापुढे ज्यांना लस घ्यायची आहे, त्यांना सक्तीने ऑनलाईन नोंदणी करून निश्चित अशी तारीख व वेळ घ्यावी लागणार आहे. नोंदणी आणि पूर्ववेळ निश्चित केली नसेल तर कोणत्याच केंद्रावर लाभार्थ्यांना लस मिळणार नाही.
गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला तशी लस घेणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या पंचेचाळीस वर्षांच्या वरील नागरिकांना लस दिली जात असून शनिवारपासून अठरा वर्षांवरील नागरिकांना लस दिली जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या दुप्पट होणार असून लसीकरण केंद्रावरील रांगा आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारी महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासह आधी तारीख व वेळ निश्चित करणाऱ्या नागरिकांचेच लसीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
मंगळवारी याबाबत महापालिकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक झाली. या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आज, बुधवारपासूनच त्याची अंमलबजावणी होणार आहे. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, ज्याच्याकडून ऑनलाईन नोंदणी होणार नाही त्यांच्या बाबतीत काय करायचे यावरही चर्चा झाली. त्यांची नोंदणी करण्याकरिता लसीकरण केंद्रावरच काही शिक्षकांना बसवून त्यांच्यामार्फत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यात येईल.
ज्यांची ऑनलाईन नोंदणी होणार नाही, पूर्वनिश्चित तारीख व वेळ घेतली जाणार नाही त्यांना लसीकरण केले जाणार नाही. हा निर्णय घेण्यामागे नागरिकांचा त्रास कमी व्हावा, त्यांना लसीकरण केंद्राबाहेर पहाटेपासून रांगेत उभे रहावे लागून नये, लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांवर त्याचा ताण पडू नये ही प्रशासनाची भूमिका आहे. ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांना दिलेल्या तारखेला व दिलेल्या वेळी केंद्रावर जायचे आहे. त्यामुळे सर्वांचाच वेळ वाचून लसीकरण कामात सुसूत्रीपणा येणार आहे.
-कशी नोंदणी करायची?
ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली नाही त्यांनी लसीकरण केंद्रामध्ये परस्पर गर्दी करण्यापेक्षा ‘कोविन.जीओव्ही.इन’ या बेवसाईटवर लाॅगिन करून त्यामध्ये तुमचा आधार क्रमांक टाकून जो ओटीपी येतो तो टाकून त्यानंतर आपले नाव व जन्मतारीख टाकून शेवटी तुम्ही रहात असलेल्या परिसराचा पिनकोड क्रमांक टाकावा. तो टाकल्यानंतर तुम्ही रहात असलेल्या परिसरातील जवळच्या लसीकरण केंद्रामध्ये उपलब्ध असलेली जवळची तारीख व वेळ तुम्हांला एसएमएस स्वरुपात अपॉईंटमेंट मिळून जाईल. त्या तारखे दिवशीच आधार कार्ड व तो एसएमएस आलेला मोबाईल घेऊन केंद्रावर जावे.