पट्टणकोडोली ग्रामस्थांसह पदाधिकाऱ्यांचा घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:51 AM2020-12-11T04:51:42+5:302020-12-11T04:51:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पोटठेकेदाराने पाणी योजनेचे काम न केल्याने कारभाराचा पंचनामा करून घेण्याची वेळ गुरुवारी जिल्हा परिषदेच्या ...

Ghagar Morcha of office bearers with Pattankodoli villagers | पट्टणकोडोली ग्रामस्थांसह पदाधिकाऱ्यांचा घागर मोर्चा

पट्टणकोडोली ग्रामस्थांसह पदाधिकाऱ्यांचा घागर मोर्चा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पोटठेकेदाराने पाणी योजनेचे काम न केल्याने कारभाराचा पंचनामा करून घेण्याची वेळ गुरुवारी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागावर आली. पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील पाणी योजना सहा वर्षे रखडल्याने ग्रामस्थांसह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी घागर मोर्चा काढून प्रवेशद्वारावरच ठिय्या मारला. पाच तासांनंतरही आंदोलन मागे न घेतल्याने अखेर फेब्रूवारी २०२१ पर्यंत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.

या गावासाठी २०१४ साली ५ कोटी ५३ लाखांची पेयजल योजना मंजूर करण्यात आली होती. मात्र, मूळ ठेकेदाराने पोटठेकेदार नेमला आणि त्यानंतर काम रखडले. सहा वर्षे झाली तरी काम अपूर्ण आहे. त्यामुळे संतापलेल्या पदाधिकारी, ग्रामस्थांनी दुपारी १२ वाजता घागर मोर्चा काढला. मोर्चा प्रवेशद्वारावर अडविल्यानंतर सर्वांनीच रस्त्यावर ठिय्या मारला. उपसरपंच कृष्णाजी मसूरकर यांनी पाणीपुरवठा विभागाचे यावेळी पुरते वाभाडेच काढले.

चर्चेसाठी कोणाकडेही येणार नाही असे मसूरकर यांनी स्पष्ट केल्यानंतर अखेर प्र. कार्यकारी अभियंता मनीष पवार हे मोर्चासमोर आले. यावेळी मसूरकर यांनी त्यांना विविध प्रश्न विचारून धारेवर धरले. मूळ काम तुम्ही दिला, त्यांनी पोटठेकेदार दिला. त्याने काम पूर्ण केले नाही. उलट योजनेच्या दुरुस्तीसाठी आम्हाला साडेतीन लाख रुपये खर्च आला आहे. तुमचा एक अधिकारी त्याची एमबी मंजूर करत नाही म्हणून दुसऱ्या अधिकाऱ्याकडून ती मंजूर केली जाते. यात आम्हा ग्रामस्थांची काय चूक, असा सवाल त्यांनी विचारला. यावेळी अधिकाऱ्यांना उत्तर देता आले नाही.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे मुंबईला गेल्याचे सांगण्यात आले. मात्र, लेखी पत्राशिवाय हलणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्यामुळे मित्तल यांच्याशी संपर्क साधण्यात आला. तोपर्यंत आमदार राजू आवळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर हे आले. अध्यक्ष बजरंग पाटील, सभापती प्रवीण यादव, राजेश पाटील, विजय भाेजे यांच्या उपस्थितीत चर्चा झाली आणि अखेर काम करण्याबाबत लेखी पत्र देण्यात आले.

सरपंच विजया जाधव, सदस्य धुळा डावरे, सूर्यकांत भोजे, विमल चव्हाण, अश्विनी पिराई, खानदेव पिराई, बिरू कुशाप्पा, नंदकुमार माळी यांच्यासह सदस्य यावेळी उपस्थित होते.

चौकट

लोकप्रतिनिधींच्या नातेवाइकाला ठेका

एका लोकप्रतिनिधीच्या नातेवाइकाला हा ठेका दिल्याने यामध्ये दबाव आणला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. माने आडनावाच्या या ठेकेदाराला गावात पाठविले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. कोट्यवधीची योजना केवळ पोटठेकेदारामुळे अपुरी असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

१०१२२०२० कोल झेडपी ०१

पट्टणकोडोली ग्रामस्थांसह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पाणी योजनेच्या विलंबाबाबत जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा काढला.

छाया - नसीर अत्तार

Web Title: Ghagar Morcha of office bearers with Pattankodoli villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.