काॅंग्रेस, राष्ट्रवादी, भाजपमध्ये होणार घमासान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:11 AM2021-02-05T07:11:50+5:302021-02-05T07:11:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : साडे तीन पीठांपैकी एक पीठ आणि आई अंबाबाईच्या नावे असलेल्या महालक्ष्मी मंदिर प्रभागात यंदा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : साडे तीन पीठांपैकी एक पीठ आणि आई अंबाबाईच्या नावे असलेल्या महालक्ष्मी मंदिर प्रभागात यंदा चांगलेच राजकीय घमासान रंगणार आहे. हा प्रभाग सर्वसाधारण झाल्यामुळे या ठिकाणी आता इच्छुकांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. मात्र, चुरस ही प्रमुख पक्षातच राहणार आहे.
महापालिकेचे माजी स्थायी सभापती आदिल फरास यांची राष्ट्रवादीकडून येथील उमेदवारी निश्चित आहे. त्यांच्या मातोश्री हसीना फरास विद्यमान नगरसेविका असताना आदिल यांनी आपली ताकद वापरून मतदारसंघात रस्ते, पाणी, ड्रेनेजची अनेक नियोजनबध्द कामे केली आहेत. वडील बाबू फरास, आई हसीना फरास यांनी कोल्हापूरचे महापौरपद भूषविले आहे. त्यामुळे या घराला परंपरा आहे. त्याचा पुरेपूर फायदा आदिल यांनी विकासकामांसाठी करून घेतला आहे.
विरोधी पक्षनेते भाजपचे अजित ठाणेकर यांचा आधीचा तटाकडील तालीम प्रभाग राखीव झाल्याने आता त्यांनी या प्रभागातून भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. जी निश्चित मानली जाते. ठाणेकर यांनी विविध मुद्द्यांवर महापालिकेमध्ये सत्तारूढांना उघडे पाडले होते. ठाणेकर यांनी त्यांच्या आधीच्या मतदारसंघात चांगले काम करून दाखवले. सातत्याने जनसंपर्क आणि घरफाळा आणि अन्य प्रश्नांची आक्रमक मांडणी ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत.
गेल्यावेळी भाजपमधील ज्येष्ठ नेते आर. डी. पाटील यांच्या कन्या श्रुती यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, हसीना फरास यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. गेल्या पाच वर्षांत आर. डी. आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळेच आर. डी. पाटील यांनी काॅंग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे. काॅंग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे बंधू विद्यमान नगरसेवक संभाजी जाधव हे देखील या प्रभागातून इच्छुक आहेत. परंतु, ते पाटाकडील तालीम या महिलांसाठीच्या आरक्षित प्रभागातून पत्नीला उतरवू इच्छित असल्याने एकाच घरात दोन उमेदवारी दिल्या जातील का याबदद्ल ते साशंक आहेत. अगदीच अपवादात्मकरित्या जर दोघांना उमेदवारी देण्याचे ठरले तर आर. डी. पाटील हे तटाकडील तालीम प्रभागात पत्नीला रिंगणात उतरवू शकतात. पृध्वीराज यादव यांनीही यंदा निवडणूक लढवण्याची तयारी केली असून त्यांनी नागरिकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.
प्रभाग क्रमांक ३३
महालक्ष्मी मंदिर
विद्यमान नगरसेवक
हसीना फरास
आताचे आरक्षण
सर्वसाधारण
गतनिवडणुकीतील प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते
हसीना फरास, राष्ट्रवादी २४९७
अर्चना भुर्के शिवसेना १५१
परिनाज मुजावर काॅंग्रेस ३३
श्रुती पाटील भाजप १९२९
कोट
मतदारसंघामध्ये चौफेर कामे केली आहेत. महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक येत असल्याने येथे अधिक लक्ष केंद्रीत केले. रस्ते, गटारी, ड्रेनेज पाईपलाईनबरोबरच हनुमान मंदिर, संत गाडगेबाबा पुतळा परिसर सुशोभीकरण, पाच जुन्या विहिरी दुरूस्त करून, गाळ काढून वापरात आणल्या. नळ पाणीपुरवठा व्यवस्थित होण्यासाठी अनेक पाईपलाईन बदलल्या.
- हसीना फरास, विद्यमान नगरसेविका
ही झाली आहेत कामे
या प्रभागातील रस्ते, पाणी, ड्रेनेज आणि गटारांची अनेक कामे झाली आहेत. सनगर गल्ली, खरी कॉनर्र, मिरजकर तिकटी यासह अनेक रस्त्यांंचे डांबरीकरण करण्यात आले आहे. पाच जुन्या विहिरी दुरुस्त करून वापरात आणल्या आहेत. अंबाबाई मंदिरात ४ इंची पाईप लाईन टाकण्यात आली आहे. करवीर नगर वाचन मंदिरसमोरील रस्त्याचे कामही आता सुरू हेाणार आहे.
हे आहेत प्रश्न
अंबाबाई मंदिर, महाव्दार रोड, ज्योतिबा रोड, मिरजकर तिकटी असा गर्दीचा परिसर या प्रभागात येतो. त्यामुळे येथे पार्किंग, फेरीवाले, अतिक्रमणे याविषयीसारख्या तक्रारी होत असतात. यावर तोडगा काढण्यात संपूर्ण यश आलेले नाही. ठरावीक भागात कामे केल्याचा आक्षेप, सार्वजनिक स्वच्छतेमध्ये सातत्य नसणे.
०२०२२०२१ कोल महालक्ष्मी मंदिर
महालक्ष्मी मंदिर परिसरात सातत्याने होणारी वाहतुकीची कोंडी नागरिकांना त्रासदायक ठरत आहे.