जयसिंगपुरात ‘घरकुल’ सर्व्हे पालिकेचा पुढाकार : ‘प्रधानमंत्री आवास’साठी नागरिकांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:59 AM2018-08-11T00:59:23+5:302018-08-11T01:00:05+5:30
केंद्र सरकारने सन २०२२ पर्यंत सर्वांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर शहरातील घरांच्या मागणीबाबत पालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे. चार घटकांतर्गत या घरकुलांचा लाभ लाभार्थ्यांना मिळणार आहे.
संदीप बावचे।
जयसिंगपूर : केंद्र सरकारने सन २०२२ पर्यंत सर्वांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर शहरातील घरांच्या मागणीबाबत पालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे. चार घटकांतर्गत या घरकुलांचा लाभ लाभार्थ्यांना मिळणार आहे. गेल्या वर्षभरापासून ही योजना राबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, योजनेतील अटींमुळे लाभार्थी मिळणे प्रशासनासमोर अवघड बनले. पालिका सभेत नगरसेवकांकडून या योजनेबाबत विचारणा झाल्यानंतर पुन्हा एकदा पालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुलासाठी नागरिकांना आवाहन केले आहे.
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुल वाटपाची जुनी योजना बंद करत केंद्र सरकारने सन २०१२ च्या सामाजिक, आर्थिक आणि जातीनिहाय सर्वेक्षणाच्या आधारे प्रधानमंत्री आवास योजना सन २०१६ पासून सुरू केली आहे. त्यानंतर सर्वेक्षणाआधारे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनाही ही योजना लागू आहे. जयसिंगपूर शहरातही प्रधानमंत्री आवास योजना राबविण्याबाबत ठराव झाला होता. मात्र, योजनेला शहरातून अल्पसा प्रतिसाद मिळाला. नुकत्याच झालेल्या पालिका सभेत या योजनेची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप नगरसेविका अॅड. सोनाली मगदूम यांनी केला होता. नगरसेवक अस्लम फरास यांनी आपण तीन जणांचे घरकुल योजनेसाठी बँकेत अर्ज दिले आहेत. मात्र, बँक पैसे द्यायला तयार नाही, असे स्पष्ट केले होते. योजनेवरून सभेत ऊहापोह झाल्यानंतर पालिका प्रशासनाने याबाबत पुढाकार घेतला आहे
योजनेतील घटक
केंद्र शासनाने सर्वांना २०२२ पर्यंत पक्की घरे उपलब्ध करुन देण्याबाबत धोरण ठेवले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जयसिंगपूर शहरात त्याची अंमलबजावणी करण्याकरिता शहरात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये चार घटकांचा समावेश असून ज्याठिकाणी झोपडपट्ट्या आहेत त्याठिकाणी घरांची निर्मिती करणे, लाभार्थ्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार घरे उभारणे, भागीदारी तत्त्वावर घरांची निर्मिती करणे, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना स्वत:च्या जागेवर नवीन घरकुल अथवा राहत्या घराचे वाढीव बांधकामासाठी अनुदान, अशा घटकांचा या योजनेत समावेश केला आहे.
उत्पन्न मर्यादा प्रधानमंत्री आवास योजनेसाठी
अत्यल्प ३ लाख, तर अल्प ६ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्नाची अट आहे. भारतात कुठेही स्वमालकीचे घर नसावे. जयसिंगपूर पालिका क्षेत्रातील लाभार्थ्यांनाच या योजनेत सहभाग घेता येईल. एकूणच पालिकेने घरकुल योजनेसाठी पुढाकार घेतला आहे..
प्रस्तावाचे आवाहन
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जयसिंगपूर शहरातील मागणी विचारात घेऊन या योजनेचा कृती आराखडा तयार करुन तो शासनाला सादर केला जाणार आहे. घरांची मागणी व प्रस्ताव सादर करण्यासाठी नगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे. लाभार्थ्यांना घरे मागणीसाठी आॅनलाईन अर्ज उपलब्ध करण्यात आली आहेत शिवाय पालिकेतदेखील अर्ज उपलब्ध आहेत.