उद्योगपतींसाठीच ‘अमृत’ योजनेचा घाट : एन. डी. पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 01:01 AM2018-05-28T01:01:10+5:302018-05-28T01:01:10+5:30
कोल्हापूर : इचलकरंजी येथील प्रस्तावित‘अमृत जलसिंचन योजना’ नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी नसून, त्यांच्या आडून उद्योगपतींना पाणी देण्याचा घाट असल्याचा आरोप ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी केला. ‘माझ्या ७५ वर्षांच्या जीवनात मी जो निर्णय घेतला, तो विचारपूर्वक घेतला असून, कोणीपण येऊन मला बदनाम करायला ‘एन. डी.’ म्हणजे पालापाचोळा नव्हे!’ अशा शब्दांत प्रा. पाटील यांनी इचलकरंजीतील नेत्यांना सुनावले.
इचलकरंजी येथील पाणी योजनेवरून वाद सुरू आहे, त्याबाबत रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. पाटील यांनी आपली भूमिका अधोरेखित केली. प्रा. पाटील म्हणाले, इचलकरंजीतील नागरिकांना पिण्याचे पाणी देण्यास आमचा विरोध नाही. ही आपली सुरुवातीपासूनची भूमिका आहे; पण तेथील नेत्यांचा दानोळी डोहातूनच उपसा करण्याचा आग्रह आहे. यामध्ये आपणाला मखलाशी दिसत असून, जीवन प्राधिकरणाकडील नगरपालिकेच्या माहितीनुसार ८०० एच. पी.च्या पाच विद्युत पंपांनी चार फूट व्यासाच्या पाईपमधून ‘वारणा’ नदीतून पाणी उपसा करण्याचे नियोजन आहे. याद्वारे सारी वारणा नदीच उपसा करण्याचा डाव असून, ही लबाडी खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी याबाबत बैठक बोलावली आहे. त्यानंतर पाणी परिषदेचा निर्णय घेणार असल्याचे प्रा. पाटील यांनी सागिंतले.
इचलकरंजीतील काळ्या ओढ्याची चित्रफीत दाखवत आमदार उल्हास पाटील म्हणाले, ओढ्यात सोडलेले रसायनयुक्त पाणी थेट पंचगंगेत मिसळते. त्यामुळे शिरोळमधील १८ हजार लोकांना कॅन्सरने ग्रासले आहे. या मंडळींनीच वारणा उजव्या कालव्याला विरोध केला. तो झाला असता तर आज ही वेळ आलीच नसती. आमदार डॉ. सुजित मिणचेकर, विक्रांत पाटील, भगवान काटे, आदी उपस्थित होते.
जुन्या योजनेत ‘ढपला’
मजलेवाडी येथील जुन्या योजनेच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी कोणाची होती ? जमिनीतून पाईप टाकणार तर ती कोणत्या दर्जाची असावी? याचा अभ्यास न करता केवळ ‘ढपला’ पाडण्याचे काम केल्याचा आरोपही प्रा. पाटील यांनी केला.
‘वारणा’चे पाणीवाटप, टीएमसी
एकूण क्षमता ३४
पिण्यासाठी ९.५
शेतीसाठी ८
उद्योग १.२
वाघुर्डी ७
मृत साठा ७
पाण्याची वाफ १.५
मिशीतील जांभूळ
जांभळाच्या झाडाखाली झोपल्यानंतर एका व्यक्तीच्या मिशीवर जांभूळ पडते आणि ते तिथेच अडकते. त्याला वाटते, दुसऱ्या कुणीतरी येऊन ते मिशीतील जांभूळ आपल्या तोंडात घालावे, अशी स्थिती सध्या इचलकरंजीच्या नेत्यांची झाल्याची टीका प्रा. पाटील यांनी केली.
शनिवारी रॅली
‘वारणा’, ‘कृष्णा’ व ‘पंचगंगा’ काठांवरून शनिवारी (दि. २) सकाळी आठ वाजता मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. तीन रॅली किणी येथे एकत्र येऊन ती वारणानगर येथे जाणार आहे.
‘चिंगी’ महिन्याची आणि तिची ‘वरात!’
नगरपालिकेने २०४९ ची लोकसंख्या गृहीत धरून पाणी योजना केली आहे. हे म्हणजे ‘चिंगी’ अजून महिन्याची झाली नाही तोपर्यंत तिच्या वरातीत बॅँड कोणता आणायचा, याची तयारी आहे, असे पालकमंत्र्यांना मुंबईतील बैठकीत म्हटलो, ते जरा त्यांना झोंबल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले.