हिंदुत्ववाद्यांकडून देशाचे नाव बदलण्याचा घाट: सुकुमार कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 10:00 AM2020-02-03T10:00:05+5:302020-02-03T10:01:41+5:30
प्रा. सुकुमार कांबळे म्हणाले, गौतम बुद्धांचा धम्म म्हणजे माणसांचा शोध आहे. बुद्धांनी त्रिशरण, पंचशील व अष्टांग तत्त्वांतून जगाला प्रेरणा दिली. जग सुखी व्हायचे असेल तर बुद्धांशिवाय पर्याय नाही. बुद्धांच्या अष्टांगांमध्ये माणसाने कसे वागायचे व कसे जगायचे हे शिकविले जाते.
कोल्हापूर : नागरिकत्व दुरुस्ती व नागरिकत्व नोंदणी कायद्याच्या माध्यमातून हिंदुत्ववाद्यांकडून देशाचे नाव आणि भारतीय घटना बदलण्याचा घाट घातला जात आहे. तो रोखण्याची गरज आहे, असे प्रतिपादन डेमोक्रॅटिक पार्टी आॅफ इंडियाचे संस्थापक प्रा. सुकुमार कांबळे यांनी रविवारी येथे केले.
दसरा चौक मैदानावर बौद्ध प्रणाली चॅरिटेबल ट्रस्ट, सिद्धार्थनगरतर्फे धम्मदीक्षा व धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते ‘सद्य:स्थिती पर्याय- बौद्ध धम्म’ या विषयावरील व्याख्यानात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. रघुनाथ कांबळे, बाळासाहेब भोसले, एस. पी. कांबळे, सुबोधकुमार कोल्हटकर, सुशील कोल्हटकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. सुकुमार कांबळे म्हणाले, गौतम बुद्धांचा धम्म म्हणजे माणसांचा शोध आहे. बुद्धांनी त्रिशरण, पंचशील व अष्टांग तत्त्वांतून जगाला प्रेरणा दिली. जग सुखी व्हायचे असेल तर बुद्धांशिवाय पर्याय नाही. बुद्धांच्या अष्टांगांमध्ये माणसाने कसे वागायचे व कसे जगायचे हे शिकविले जाते. बौद्ध धम्म हा विज्ञानावर आधारित असल्याने तो काळानुरूप होणारे बदल स्वीकारतो. या धम्माच्या विस्तारासाठी खेड्यापाड्यांत जाऊन बारा बलुतेदारांनाही हा धम्म स्वीकारण्यास प्रवृत्त करण्याची गरज आहे. यासाठी अशा धम्म परिषदा आता खेड्यांमध्ये घेण्याची गरज आहे. हा देश बौद्धमय होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
दरम्यान, पहिल्या सत्रात सकाळी १० वाजता सिद्धार्थनगर येथे धम्म रॅलीचे उद्घाटन झाले. येथून ही रॅली दसरा चौक येथील धम्म परिषदेच्या ठिकाणी नेण्यात आली. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर १०.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते धम्मदीक्षा सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. दुपारी १२ वाजता भन्ते आर. आनंद (वसगडे), भन्ते एस. संबोधी (आजरा), भन्ते राहुल (औरंगाबाद) यांच्या हस्ते सुमारे ५० जणांना बौद्ध दीक्षा देण्यात आली. दुपारी दोन वाजता ‘आम्ही भीमयात्री’ हा प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम झाला.