श्रमिकांना संपविण्याचा घाट
By admin | Published: January 30, 2015 09:26 PM2015-01-30T21:26:53+5:302015-01-30T23:15:29+5:30
अशोक ढवळे यांची टीका : ‘भाकप’चे दोन दिवसीय अधिवेशन सुरू
कोल्हापूर : ज्या गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले, त्यांच्याच मारेकऱ्यांच्या हातात देशाची आणि राज्याची सत्ता आहे. भांडवलदारांना हाताशी धरून कष्टकरी, शेतकरी आणि कामगार यांच्या हक्कांवर गदा आणण्याचे षड्यंत्र मोदी सरकारने रचले आहे. धर्मांध वृत्ती धर्मपरिषदांमधून धर्मनिरपेक्षतेलाच आव्हान देत आहेत. अशा परिस्थितीमध्ये देशाची एकात्मता आणि श्रमिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी डाव्या पक्षांनी एकजुटीने लढण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भारताचा कम्युनिस्ट पक्षाचे े(मार्क्सवादी) राज्य सचिव अशोक ढवळे यांनी केले.
भारताचा कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने (मार्क्सवादी) कोल्हापूर येथील आठव्या दोन दिवसीय अधिवेशनाचे उद्घाटन आज, शुक्रवारी ढवळे यांच्या हस्ते झाले. यानंतर ते बोलत होते. नथुराम गोडसेसारख्या वृत्तींचे उदात्तीकरण करून देशाचा इतिहासच बदलण्याचे कारस्थान सुरू आहे. हे रोखून देशात धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मता सामाजिक न्याय आणि श्रमाला न्याय देण्यासाठी वैचारिक व राजकीयदृष्ट्या प्रगल्भ, पुरोगामी कार्यकर्त्यांची फळी उभारणे गरजेचे आहे, असे ढवळे यांनी सांगितले.
माजी आमदार संपतराव पवार-पाटील म्हणाले, राजकारण तत्त्वहीन बनत चालले आहे. श्रमाची प्रतिष्ठा कमी होत असून, भगवे कापड परिधान केलेल्यांचे महत्त्व वाढत चालले आहे. हे वास्तव समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी लाल बावट्याच्या लढाईत तरुणांनाही सामील करून घेतले पाहिजे. यावेळी ‘माकप’चे राज्य सचिव मंडळ सदस्य महेंद्र सिंग, राज्य कमिटी सदस्य एम. एच. शेख यांची भाषणे झाली. चंद्रकांत यादव यांनी प्रास्ताविक, जिल्हा सचिव सुभाष जाधव यांनी अहवाल वाचन, उदय नारकर यांनी सूत्रसंचालन, तर शिवाजी मगदूम यांनी आभार मानले.
कहाँ गये अच्छे दिन...
‘अच्छे दिन’चा संदर्भ देत ढवळे म्हणाले, ‘एका महिन्यात महागाई कमी करण्याचे तसेच बेरोजगारांना नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले होते. आजही महागाई कमी झालेली नाही. रोजगार हमी योजना गुंडाळण्याच्या दृष्टीने मोदींची हालचाल सुरू आहे. कामगार कायदे रद्द करण्याचा घाट मोदी यांनी घातलेला आहे. विमा क्षेत्रात परकीय गुंतवणुकीची मर्यादा वाढल्यामुळे देशातील विमा कंपन्यांमध्ये बेकारी वाढणार आहे.