घाटगे-मंडलिक-घाटगे एकाच व्यासपीठावर
By admin | Published: December 28, 2016 12:08 AM2016-12-28T00:08:44+5:302016-12-28T00:08:44+5:30
संजय मंडलिक : तिघांनी एकत्र यावे या जनमताच्या कौलाचा आदर करणार; करड्याळला कार्यक्रम
सेनापती कापशी : नगरपालिकांच्या निवडणुकीत भ्रष्टाचारमुक्त कारभार व शाश्वत विकासाकडे नेणारे प्रशासन हा आमचा नारा होता. कागल व मुरगूड येथील जनतेने आम्हाला भरभरून मते दिली व घवघवीत यश मिळवून दिले. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी संजय घाटगे, समरजितसिंह घाटगे व आम्ही एकत्र यावे हा जनमताचा कौल आहे. त्याचा आदर करू, असे प्रतिपादन शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक यांनी केले.
ते करड्याळ (ता. कागल) येथील ग्रामपंचायत कार्यालय उद्घाटनप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संजय घाटगे, तर प्रमुख पाहुणे म्हणून शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे होते.
समरजितसिंह घाटगे म्हणाले, मी व्यवस्थापनातून मोठा झालो आहे. व्यक्ती मोठी नसते तर व्यवस्थापन मोठं झालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. कागल नगरपालिकेत नकारात्मक राजकारण फार झाले. याला उत्तर देण्यासाठी सकारात्मक राजकारण पुढे आणणे गरजेचे आहे. कागल तालुक्याच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र आले पाहिजे. कागल मोठं झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. गेली अनेक वर्षे रखडलेला अर्जुनवाडा - करड्याळ दरम्यानचा चिकोत्रा नदीवरील पुलाच्या बांधकामास साडेआठ कोटी रुपये मंजूर झाले असून, लवकरच कामास सुरुवात होत आहे. नागणवाडी प्रकल्प मी आता हातात घेतला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प पूर्ण करणार, असेही ते म्हणाले.
माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, नगरपालिका निवडणुकीत काही चुका झाल्या त्या पाठीमागे सोडून एकमेकांचा आदर ठेऊन विश्वासास कोणताही तडा जाऊ न देता तालुक्याच्या विकासाकरिता एकत्र येण्याची पूर्तता करा. मी मोठा की तू मोठा याचा विचार बाजूला ठेऊन जनमताचा आदर करुया.
स्वागत प्रकाश पाटील, प्रास्ताविक आय. डी. कुंभार यांनी केले. आभार उपसरपंच संजय गेंगे यांनी मानले.
यावेळी उपसभापती भूषण पाटील, ‘शाहू’चे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, विश्वास कुराडे, शहाजी यादव, राजाभाऊ माळी, दाजी कुंभार, दत्तात्रय वालावलकर, रामचंद्र सांगले, मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार, सरपंच लक्ष्मी कुंभार, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
नागणवाडी प्रकल्पासाठी खांद्याला खांदा
पाणी हे जीवन आहे. पाण्याअभावी चिकोत्रा खोऱ्यातील जनतेची व शेतकऱ्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. या परिसराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर राजकारण बाजूला ठेवून कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी संजय मंडलिक, संजय घाटगे व समरजितसिंह घाटगे यांनी खांद्याला खांदा लावून पाठपुरावा करणार असल्याची जाहीर भूमिका स्पष्ट केली.