घोडके-कोळेकर कुस्ती बरोबरीत
By admin | Published: December 3, 2015 11:32 PM2015-12-03T23:32:50+5:302015-12-03T23:46:47+5:30
शिरोळ येथे आयोजन : सांगलीचा सुधाकर गुंड दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी
शिरोळ : येथे श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नुरखान बादशहा देवाच्या उरुसानिमित्त बुधवारी (दि. २) रात्री कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकासाठीची कुस्ती समाधान घोडके (कोल्हापूर) विरुद्ध आण्णा कोळेकर (सांगली) यांच्यात अत्यंत चुरशीची झाली. तब्बल १ तास ५ मिनिटेचाललेली ही कुस्ती अखेर पंचांनी बरोबरीत सोडविली. १ लाख १ हजार १११ रुपये या बक्षिसासाठी ही कुस्ती झाली. यादव आखाड्यात तीन लाख रुपयांच्या बक्षिसासाठी १७२ कुस्त्या झाल्या. कुस्ती मैदानासाठी कोल्हापूर, सांगलीसह कर्नाटक सीमाभागातील मल्लांनी सहभाग घेतला.
शिरोळ तालुका कुस्तीगीर परिषद मान्यतेने शिरोळ उरुस समिती व ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित केलेल्या कुस्ती मैदानातील यादव आखाडा येथे बुधवारी दुपारी चार वाजता स्पर्धेस प्रारंभ झाला. उत्कृष्ट कुस्ती निवेदक शंकर पुजारी यांच्या हस्ते मैदानाचे पूजन झाले. गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांच्या हस्ते कुस्त्या लावण्यात आल्या. अध्यक्षस्थानी प्रदेश कॉँग्रेसचे राज्य सरचिटणीस सत्यजित देशमुख होते.
दुसऱ्या क्रमांकासाठी आमदार केसरी संग्राम पाटील (कोल्हापूर) विरुद्ध सुधाकर गुंड (सांगली) यांच्यातील कुस्ती २५ मिनिटे झाली. दोन्ही मल्लांनी चमकदार खेळ दाखविला. मात्र, कुस्ती निकाली झाली नाही. त्यामुळे पुन्हा पाच मिनिटे देण्यात आली. यामध्ये गुणावर सुधाकर गुंड हा कुस्ती जिंकून ५० हजार रुपयांचा मानकरी ठरला.
कुस्ती मैदानात प्रमुख विजेते मल्ल व त्यांची गावे : बाळू पुजारी (कोथळी), स्वप्नील कोरवी (शिरदवाड), कुबेर पुजारी (कोथळी), सागर धनगर (शिरोळ), हरी वाघमारे (शिरोळ) यांनी विजय मिळविला. तसेच लहान, मोठ्या गटांतील कुस्ती स्पर्धा यावेळी पार पडल्या. कुस्ती पाहण्यासाठी शिरोळसह परिसरातील कुस्तीशौकिनांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र केसरी आप्पा कदम, संभाजी पाटील, महापौर केसरी अमृता भोसले, विठ्ठल मोरे, ‘दत्त’चे संचालक अनिलराव यादव, भोगावती कारखान्याचे अध्यक्ष धैर्यशील पाटील उपस्थित होते. कुस्ती निवेदक म्हणून शंकर पुजारी, नंदू सुतार (कवठेसार) यांनी काम पाहिले. प्रकाश गावडे, देवाप्पा पुजारी, रावसाहेब देसाई, मजीद अत्तार, शिवाजी मोळे, संजय देबाजे यांनी पंच म्हणून काम पाहिले.
उरूस समितीचे प्रमुख शिवाजी भाट, उपसरपंच पृथ्वीराज यादव, पुंडलिक कुरणे यांनी कुस्ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)