अंधश्रध्देचे भूत उतरणार तरी कधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:29 AM2021-08-28T04:29:02+5:302021-08-28T04:29:02+5:30
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा तसा सुधारणावादी व पुरोगामी, पण येथेही बुवाबाबांचे थोंताड सुरूच असल्याचे दिसते. इथली अंधश्रध्दा निर्मूलन समिती सक्रिय ...
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा तसा सुधारणावादी व पुरोगामी, पण येथेही बुवाबाबांचे थोंताड सुरूच असल्याचे दिसते. इथली अंधश्रध्दा निर्मूलन समिती सक्रिय असल्यानेच गेल्या आठ वर्षात तब्बल ५०० गुन्हे दाखल झाले. त्यातील आठ जणांना तर शिक्षा झाली. अजूनही कोर्ट केसेस चालू आहेत. एवढे होऊन देखील समाज पुन्हा ये रे माझ्या मागल्या म्हणत अंधश्रध्देच्या आहारी जाताना दिसतो.
विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी अनेकांच्या डोक्यात असलेले अंधश्रध्देचे भूत काही कमी व्हायला तयार नाही. अंधश्रध्दा निर्मूलन समितीने किती घसा ओरडून सांगितले, प्रबोधन केले तर पालथ्या घड्यावर पाणी अशीच काहीच अवस्था असल्याचे समाजातील वास्तव आहे. त्यामुळेच कधी पैशासाठी पाऊस तर कधी पुत्रप्राप्तीसाठी भानामती, बुवाबावांचे थाेंताड असे प्रकार वारंवार पहावयास मिळत आहेत. आठ दिवसांपूर्वी कोल्हापुरात लहान मुलाचे अपहरण करून खून झाला, तसे याबाबतीत नरबळीचे काही पुरावे सापडले नसलेतरी घटना घडल्याच्या दिवशी नरबळीचीच चर्चा होत होती. यावरून अजूनही पुत्रप्राप्तीसाठी किती अघोरी पर्यायाचा अवलंब केला जातो हे स्पष्ट होते. यावरून अंधश्रध्दा निर्मूलन समितीनेदेखील प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन याबाबतची माहिती घेतली होती.
चौकट
२०१३ मध्ये झाला कायदा
राज्यात वाढत्या अंधश्रध्दाच्या पार्श्वभूमीवर अंधश्रध्दा निर्मूलन समितीने सरकारच्या मागे लागून कायदा करण्यास सरकारला भाग पाडले. बरेच वादविवाद झाल्यानंतर अंधश्रध्दा निर्मूलन ऐवजी जादूटाेणा विरोधी विधेयक असे नामकरण करत हा कायदा मंजूर केला गेला. या कायद्यामुळे अंधश्रध्दा हटल्या नाही तरी काही नसण्यापेक्षा काही असे समजून काम सुरू झाले. या कायद्यामुळे मोठी शिक्षा झाल्याचे अजून उदाहरण नसलेतरी नुसत्या धाकाने तरी बऱ्यापैकी अघोरी कृत्ये करणाऱ्यांवर वचक बसण्यास वाव मिळाला आहे.
चौकट
८ वर्षात ५०० गुन्हे
कोल्हापुरसारख्या सुधारणवादी जिल्ह्यात देखील अंधश्रध्दांचा बाजार किती फोफावला आहे, हे कायदा मंजूर झाल्यापासून ते आतापर्यंतच्या ८ वर्षात घडलेल्या गुन्ह्यांच्या संख्येवरून दिसून येते. तब्बल ५०० गुन्हे दाखल झाले.
चौकट
भानामती कसली, हे तर खेळ विज्ञानाचे
कोल्हापुरात भानामतीचे प्रकार फारसे घडताना दिसत नाहीत, पण पोटातील बाळाचे लिंग बदलतो, मुलगाच जन्माला आणून दाखवतो, संपत्ती वाढवून देतो असे प्रकार जास्त घडताना दिसतात. यात स्वयंघोषित बुबा बाबा महाराज आघाडीवर आहेत. या सर्व प्रकारात महिलांचेच जास्त शाेषण झाल्याचे दिसतेे.
चौकट
कोल्हापुरात विक्रमनगरात केसांच्या वेणीची गळ्याला गाठ पडते, कागलमध्ये डोळ्यातून खडे पडतात, साळोखेनगरमध्ये गर्भातील बाळाचे लिंग बदलून देतो अशा कांही घडलेल्या घटनांची खूप चर्चा झाली. यावरुन अंधश्रध्दा निर्मूलन समितीने सिध्द करण्याचे आव्हानही दिले होते.
प्रतिक्रिया
स्वर्ग, नरक, आत्मा, परमात्मा, माेक्ष असे काही नसतेे, पण मोक्षाच्या नावाखाली लोकांच्या मनातील भीतीचा बागुलबुवा उभा करून लालूच दाखवून देवभोळ्या लोकांना जाळ्यात ओढले जाते. आस्तिक, नास्तिक हा ज्याचा वैयक्तिक प्रश्न, पण माणसाने जगताना सद्सद्विवेक बुध्दी ठेवून जगले तर अंधश्रध्देचा बाजार भरण्याआधीच उठतो.
अनिल चव्हाण, अंधश्रध्दा निर्मूलन समिती