भूतबाधा, करणीच्या नावाखाली महिलेस आठ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 03:07 PM2019-07-30T15:07:16+5:302019-07-30T15:10:05+5:30
आईचे भूत बाहेर काढतो, मुलीचे लग्न जमवितो, नवीन गाडीचा विधी, घरातून भूतबाधा, करणी दूर करण्यासाठी दोन भोंदू कुटुंबियाने आठ लाख रुपये घेवून जीवे मारण्याची धमकी देऊन महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयित मनीषा विद्याधर नाईक, तिचा पती विद्याधर आण्णासाहेब नाईक, भक्ती विद्याधर नाईक (सर्व रा. जिवबा नाना जाधव पार्क) आणि सुनीता सतीश कारंडे (रा. आर. के. नगर) यांच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कोल्हापूर : आईचे भूत बाहेर काढतो, मुलीचे लग्न जमवितो, नवीन गाडीचा विधी, घरातून भूतबाधा, करणी दूर करण्यासाठी दोन भोंदू कुटुंबियाने आठ लाख रुपये घेवून जीवे मारण्याची धमकी देऊन महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
संशयित मनीषा विद्याधर नाईक, तिचा पती विद्याधर आण्णासाहेब नाईक, भक्ती विद्याधर नाईक (सर्व रा. जिवबा नाना जाधव पार्क) आणि सुनीता सतीश कारंडे (रा. आर. के. नगर) यांच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
करवीर पोलिसांनी सांगितले की, संशयित चौघांनी फियार्दी ज्योती सूर्यकांत चन्नी (वय ५० रा. डी वॉर्ड, गंगावेश ) यांना आईचे भूत काढतो, मुलीचे लग्न जमवून देतो, नवीन गाडीचा विधी करत असल्याची कामे करीत असल्याचे सांगितले. त्यासह घरातील भूतबाधा आणि करणी दूर करण्यासाठी वेळोवेळी पैशाची मागणी केली.
विधी होम हवनसह नियोजित दत्त मंदिर जागेसाठी, महाप्रसादासाठी मार्च २०१४ पासून ते फेब्रुवारी २०१९ या कालावधी आठ लाख रुपये घेतले. ही सर्व रक्कम स्वखुशीने देणगी म्हणून देत असल्याचे करारपत्रावर लिहून घेतले. मात्र ही सर्व धार्मिक विधीचे आमिष दाखवून केवळ पैसे उकळल्याचे त्यांच्या लक्षात आले.
आपली फसवणूक झाल्याचे समजताच ही रक्कम परत मागण्यासाठी फियार्दी त्यांच्या घरी गेल्या असता त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार मनीषा विद्याधर नाईक यांच्या जिवबा नाना जाधव पार्क येथील घरी मार्च २०१४ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत घडला. नाईक आणि कारंडे कुटुंबियांनी अनेकांना भूतबाधा, करणीची भिती घालून पैसे उकळल्याची चर्चा आहे. पोलीस निरीक्षक सुनिल पाटील तपास करीत आहेत.