Kolhapur: शासनाच्या धोरणात्मक निर्णयाविरोधात बोलणे पडले महागात, शिक्षक गिरीष फोंडे तडकाफडकी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 11:47 IST2025-04-05T11:47:27+5:302025-04-05T11:47:56+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीकडील सहायक शिक्षक गिरीष आनंदा फोंडे यांना शुक्रवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात ...

Kolhapur: शासनाच्या धोरणात्मक निर्णयाविरोधात बोलणे पडले महागात, शिक्षक गिरीष फोंडे तडकाफडकी निलंबित
कोल्हापूर : महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीकडील सहायक शिक्षक गिरीष आनंदा फोंडे यांना शुक्रवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधातील आंदोलनाच्या अनुषंगाने शासनाच्या धोरणात्मक निर्णयांविरुद्ध बोलणे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यास विरोध करण्याची भूमिका त्यांच्या अंगलट आली.
फोंडे हे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील लोणार वसाहत विद्यामंदिर या शाळेत सहायक शिक्षक या पदावर कार्यरत होते. त्यांच्यावर शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास करण्याच्या दृष्टीने दर्जेदार शिक्षण देण्याचे कामकाज पूर्ण क्षमतेने करण्याची जबाबदारी देण्यात आली होती तरीही मूळ कामाकडे दुर्लक्ष करून त्यांनी शक्तिपीठ आंदोलनात सहभाग घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विरोधात प्रक्षोभक वक्तव्य करून त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ कलम ५ (१) मधील तरतुदीचा भंग झाल्याने त्यांच्यावर उपायुक्त पंडित पाटील यांनी ही कारवाई केली.
यापूर्वी फोंडे यांनी शिक्षणसेवक या पदावर असताना प्राथमिक शिक्षण मंडळ सभापती यांच्याविरुद्ध अवमानकारक निवेदन दिले होते. महापौरांना दुरुत्तरे देऊन त्यांचाही अवमान केला होता तेव्हा दि.१३.०९.२००४ चे आदेशाने त्यांची सेवा समाप्ती करण्यात आली होती. त्यानंतर अध्यक्ष, ग्रीव्हेन्स कमिटी, मुंबई यांचे आदेशानुसार दि.१७.०२.२००५ रोजी त्यांना पुनश्च: सेवेत हजर करून घेण्यात आले.
त्यानंतर वर्ल्ड फेडरेशन ऑफ डेमोक्रेटीक युथ यांच्या उपाध्यक्षपदी राहून जगभर संपर्क प्रस्थापित करण्यासाठी दि.१६.०८.२०१२ ते १५.१०.२०१४ अखेर विनापरवानगी गैरहजर राहिले होते. त्यावेळी त्यांच्या दोन वेतनवाढी कायमस्वरुपी रोखण्याची कारवाई करण्यात आली होती. वारंवार सूचना देऊनही फोंडे यांच्यात कोणत्याही प्रकारचे गांभीर्य घेतल्याचे दिसून येत नसल्याचे निलंबन आदेशात नमूद केले आहे.