Kolhapur: गिरीश शहा यांना भागीदाराचा सहा कोटींचा गंडा, ३ किलो दागिन्यांची हिशोब न देता केली विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 11:44 IST2025-01-29T11:43:59+5:302025-01-29T11:44:33+5:30
अनिल ओसवाल अटकेत, २००९ ते २०२१ दरम्यान फसवणूक

Kolhapur: गिरीश शहा यांना भागीदाराचा सहा कोटींचा गंडा, ३ किलो दागिन्यांची हिशोब न देता केली विक्री
कोल्हापूर : भागीदारीत सुरू केलेल्या गिरीश गोल्ड या फर्ममधून विक्री केलेल्या दागिन्यांपैकी ३ किलो ६०० ग्रॅम दागिन्यांचा हिशोब न देता अनिल देवीचंद ओसवाल (वय ५५, रा. प्रतिभानगर, कोल्हापूर) याने सहा कोटींची फसवणूक केली. हा प्रकार २००९ ते २०२१ या कालावधीत घडला. याबाबत गिरीश कांतीलाल शहा (वय ६४, रा. रुईकर कॉलनी, कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी मंगळवारी (दि. २८) ओसवाल याला अटक केली.
जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गिरीश शहा आणि अनिल ओसवाल यांनी गुजरीत भागीदारीत गिरीश गोल्ड ही फर्म सुरू केली होती. २००९ ते २०२१ या कालावधीत ओसवाल याने सुमारे ३ किलो ६०० ग्रॅम दागिन्यांची विक्री व्यवहारात दाखवली नाही.
हा प्रकार लक्षात येताच शहा यांनी हिशेब मागितला. मात्र, हिशेब देण्यात टाळाटाळ होत असल्याने अखेर शहा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत तक्रार अर्ज दिला. पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार जुना राजवाडा पोलिसांनी ओसवाल याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
पैसे इतरत्र गुंतवले
दागिने विक्रीतून आलेल्या पैशातून ओसवाल याने स्थावर, जंगम मालमत्ता खरेदी केली. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले, तसेच बँकांमध्ये ठेवी ठेवल्या. काही दागिने स्वत:च्या दुकानातून विकले, अशी माहिती फिर्यादी शहा यांनी पोलिसांना दिली. ओसवाल याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.