Kolhapur: यळगूडमधील 'त्या' खुनासाठी दोन लाखांची सुपारी, गॅंगचा मास्टर माईंड समोर आणणे गरजेचे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 01:49 PM2024-09-06T13:49:27+5:302024-09-06T13:49:42+5:30
पोलिस तपासात माहिती
हुपरी : यळगूड (ता. हातकणंगले) येथील टायर पंक्चर दुकानदार गिरीष विश्वनाथ पिल्लई (वय ४७) यांचा खून त्यांचे दुकान हडपण्यासाठीच अजय दिलीप शिंगे याने दोन लाख रुपयांची सुपारी देऊन केला आहे. या प्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे.
अनिकेत ऊर्फ तुषार शामराव कांबळे (वय २४, रा. शाहूनगर), अजय दिलीप शिंगे (२३, रा. अंबिकानगर दोघेही रा. हुपरी) व आर्यन दत्तात्रय घुणके (२२, रा. मानेनगर रेंदाळ) अशी त्यांची नावे आहेत. या तिघांनाही आज न्यायालयासमोर उभे केले असता रविवार (ता. ८) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे व पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, टायर पंक्चर दुकानदार गिरीष पिल्लई यांचा मोटारसायकलमध्ये हवा भरण्याच्या सुट्या पैशांसाठी वाद होऊन गुरुवारी (दि.२९) रात्री खून करण्यात आल्याचा बनाव संशयित आरोपींकडून करण्यात आला होता. याप्रकरणी नचिकेत कांबळे याला यापूर्वीच अटक करून एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले होते. पोलिस कोठडीत असताना त्यांच्याकडे अधिक तपास करीत असताना गिरीष पिल्लई यांचे दुकान हडप करण्यासाठीच अजय शिंगे याने अनिकेत ऊर्फ तुषार कांबळे याला दोन लाखांची सुपारी देऊन हा खून केला असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यानुसार या तिघांना अटक करून पुढील तपास करण्यात येत आहे.
गॅंगचा मास्टर माईंड समोर आणणे गरजेचे
संशयित आरोपींनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घातक शस्त्रे नाचवत बनविलेल्या अनेक रिल्स पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. या रिल्समध्ये त्यांच्या हातातील घातक शस्त्रे पाहून व त्यांनी दिलेली आव्हाने ऐकून पाहणाऱ्याच्या छातीत धडकी भरल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे या गँगचा मास्टरमाईंड समाजासमोर आणण्यासाठी पोलिस कसोशीने प्रयत्न करीत आहेत.