टॅक्टर मागे घेताना ट्रॉलीखाली सापडून बालिका ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील सोनगे येथील दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 12:53 IST2025-04-11T12:52:59+5:302025-04-11T12:53:35+5:30
मुरगूड : सोनगे, ता. कागल येथे घोरपडे गल्लीत टॅक्टर मागे घेत असताना ट्रॉलीखाली चिरडून तीन वर्षीय बालिकेचा दुर्दैवी अंत ...

टॅक्टर मागे घेताना ट्रॉलीखाली सापडून बालिका ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील सोनगे येथील दुर्दैवी घटना
मुरगूड : सोनगे, ता. कागल येथे घोरपडे गल्लीत टॅक्टर मागे घेत असताना ट्रॉलीखाली चिरडून तीन वर्षीय बालिकेचा दुर्दैवी अंत झाला. या दुर्दैवी अपघाताने गावात हळहळ व्यक्त होत आहे. शिवन्या विजय चिंदगे असे बालिकेचे नाव आहे. याबाबत गावातीलच दिग्विजय विनायक कळंत्रे (वय ३५) यांच्यावर मुरगूड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत मुरगूड पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सोनगे येथील घोरपडे गल्लीमध्ये ट्रॅक्टर चालक दिग्विजय विनायक कळंत्रे (वय ३५) हे ट्रॅक्टर नं. एमएच ०९ सीजे ९१४५ व तिला जोडलेली दोन चाकी ट्रॉलीमधून आणलेले साहित्य डम्पिंग करून मागे घेत होते. त्यावेळी गल्लीत खेळत असणाऱ्या शिवन्या विजय चिंदगे ही ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या उजव्या बाजूच्या पाठीमागील चाकाखाली चिरडली.
तातडीने तिला मुरगूड ग्रामीण रुग्णालय हलवण्यात आले. पण उपचारापूर्वी डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे घोषित केले. याबाबतची फिर्याद वडील विजय शिवाजी चिंदगे यांनी मुरगूड पोलिसात दिली असून ट्रॅक्टर चालक दिग्विजय कळंत्रे (रा. सोनगे, ता. कागल) यांच्यावर मुरगूड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास पो.हे.काॅ. घस्ती करीत आहेत.