Kolhapur: ज्या स्कूल बसमधून उतरली त्याच बसखाली सापडून चिमुरडीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 11:44 AM2024-08-30T11:44:46+5:302024-08-30T11:46:34+5:30
चुये : येवती (ता. करवीर) येथे स्कूल बसमधून उतरून घरी जाणाऱ्या चिमुरडीचा बसखाली चिरडून हृदयद्रावक मृत्यू झाला. आलीना फिरोज ...
चुये : येवती (ता. करवीर) येथे स्कूल बसमधून उतरून घरी जाणाऱ्या चिमुरडीचा बसखाली चिरडून हृदयद्रावक मृत्यू झाला. आलीना फिरोज मुल्लाणी (वय ५, रा. येवती, ता. करवीर), असे मृत चिमुरडीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. याप्रकरणी बसचा चालक नवनाथ मोहन लोंढे (वय ३१) यांच्यावर इस्पुर्ली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, इस्पुर्ली (ता. करवीर) येथील दुधगंगा व्हॅली पब्लिक स्कूलची बस विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी सायंकाळी चारच्या दरम्यान येवती येथे येते. गुरुवारी नेहमीप्रमाणे चार वाजता बस गावात आली होती. बस आळवेकर यांच्या किराणा दुकानाजवळ आली असता शाळेची केजीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी आलीना ही बसमधून उतरली व जवळच असणाऱ्या घराकडे चालत जात होती. चालकाने इतर विद्यार्थी बसमधून उतरल्यानंतर बस थोडी पुढे घेतली. त्यावेळी बसचा धक्का लागल्याने ती धडपडत बसच्या मागील चाकात अडकली. चाक तिच्या डोक्यावरून गेल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला. अपघातस्थळाचे दृश्य थरकाप उडवणारे होते.
आलीनाच्या पश्चात आई-वडील व एक सात वर्षांचा भाऊ आहे. आलीनाचे वडील फिरोज हे उद्धवसेना युवासेनेचे करवीर तालुकाध्यक्ष आहेत. तसेच ते एका फायनान्स कंपनीत नोकरीस आहेत.
स्वत:च्या शाळेच्या बसनेच चिरडले
आलीना ही दुधगंगा पब्लिक स्कूल इस्पुर्ली येथे सीनियर केजीच्या वर्गात शिकत होती. नेहमीप्रमाणे ती शाळेच्या बसने ये-जा करत होती. दररोजच्या बसमधून प्रवास होत होता तीच बस आलीनासाठी काळ बनून आली. शाळेच्या बसनेच तिचा घात होईल, असे त्यांच्या कुटुंबीयांना व गावकऱ्यांना कधी वाटले नव्हते, अशी चर्चा घटनास्थळी होती.
पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला
अपघात घडल्यानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते. मृतदेहाची अवस्था पाहून लोकांमध्ये संताप वाढला होता. रागाच्या भरात स्कूल बस फोडण्याच्या तयारीत नागरिक असताना इस्पुर्ली पोलिस ठाण्याच्या सपोनि टी. जे. मगइम या घटनास्थळी हजर झाल्या. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.