‘त्या’ मुलीचा खून गुंडाकडून!

By admin | Published: January 15, 2017 01:13 AM2017-01-15T01:13:08+5:302017-01-15T01:13:08+5:30

सराईत गुन्हेगारास अटक : माळवाडीतील बलात्कार व खून प्रकरण

'That girl murderer from the crime! | ‘त्या’ मुलीचा खून गुंडाकडून!

‘त्या’ मुलीचा खून गुंडाकडून!

Next


भिलवडी : अत्यंत गुंतागुंतीच्या व आव्हानात्मक बनलेल्या माळवाडी-भिलवडी (ता. पलूस) येथील चौदावर्षीय शाळकरी मुलीवरील बलात्कार आणि खुनाच्या गुन्ह्याचा नऊ दिवसानंतर छडा लावण्यात पोलिसांना यश आले. हे कृत्य पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुंड प्रशांत ऊर्फ सोन्या ऊर्फ हिमेश राजाराम सोंगटे (वय २६, रा. माळवाडी) याने एकट्यानेच केल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
केवळ बलात्कार करण्याच्या हेतूने त्याने मुलीचा पाठलाग करून तिचे अपहरण केले. निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तिने या घटनेची कोठेही वाच्यता करू नये, यासाठी सोंगटे याने तिचा जीव घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. पीडित मृत मुलीच्या नातेवाइकांचा यामध्ये कोणताही सहभाग नाही. या घटनेचा अजूनही तपास सुरू आहे. संशयिताच्या चौकशीतून आणखी कोणाचे नाव निष्पन्न झाले तर, त्याच्यावरही कारवाई केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही, असेही शिंदे यांनी सांगितले.
माळवाडीतील मुलगी नवीन कपडे घालण्याच्या तासगाव-पलूस रस्त्यावर धान्य गोदामाजवळ तिचा मृतदेह आढळून आला होता. प्रथमदर्शनी तिच्यावर सामूहिक अत्याचार करून खून केल्याचे दिसत असल्याने जिल्हा हादरला होता. या घटनेचा जिल्हाभरात निषेध व्यक्त करुन गावे बंद ठेवण्यात आली होती. मराठा क्रांती मोर्चाने आरोपींच्या अटकेसाठी जिल्हा बंद केला होता. याचा छडा लावणे पोलिसांना आव्हान बनले होते. पोलिसप्रमुख शिंदे घटना घडल्यापासून माळवाडीत तळ ठोकून होते. दहा स्वतंत्र पथकांमार्फत तपास सुरू होता. शंभरहून अधिक संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. त्यांची वैद्यकीय तपासणीही केली होती. त्यावेळी धागेदोरे हाती लागल्यानंतर तपासाला गती मिळाली.
शिंदे म्हणाले की, पीडित मुलगी रात्री घरातून बाहेर पडल्यानंतर सोंगटे याने तिला गाठले. तिचे अपहरण करून निर्जन ठिकाणी नेले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. या प्रकाराची तिने कोठेही वाच्यता करु नये, यासाठी तिचा खून केला. बलात्कार व खून कोठे केला, या ठिकाणाचा शोध सुरू आहे. सोंगटेला सध्या अटक केली आहे. पोलिस कोठडीत चौकशी करून सर्व बाबींना उलगडा केला जाईल. (वार्ताहर)
‘तो’ मी नव्हेच!
अत्याचाराचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच कृष्णाकाठावरील भिलवडी, माळवाडी, भिलवडी स्टेशन, खंडोबाचीवाडी या गावांमध्ये बंद पुकारण्यात आला, निषेध मोर्चे काढले, आरोपीच्या अटकेसाठी भिलवडीत कॅँडल मार्च काढण्यात आला होता. यामध्ये सोंगटेही सहभागी झाला होता. ‘तो’ मी नव्हेच, अशा अविर्भावात तो वावरत होता.
संशयित रेकॉर्डवरील
भिलवडी (ता. पलूस) येथील कुख्यात गुंड पांड्या मोरे याच्या टोळीचा सोंगटे सदस्य आहे. मोरे सध्या सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रायगड या पाच जिल्ह्यातून तडीपार आहे. सोंगटेविरुद्ध मुलींची छेडछाड, खुनीहल्ला, गांजाची तस्करी, अमली पदार्थांचे सेवन, दहशत माजविणे असे अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत.
अत्याचार हाच हेतू
मुलीवर अत्याचाराच्या हेतूनेच सोंगटेने हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला कठोर शिक्षा होईल, असे भक्कम पुरावे आम्ही गोळा करीत आहोत. आतापर्यंत एकूण नऊ परिस्थितीजन्य व शास्त्रीय पुरावे गोळा करण्यात यश आले आहे. तपास योग्य दिशेने सुरू आहे. पहिला टप्प्यात संशयित हाती लागला असल्याने येथून पुढील तपासाला अधिक बळकटी मिळेल, असे शिंदे म्हणाले.
ग्रामस्थांचे आभार
संशयिताला अटक करून पोलिस त्याचे नाव जाहीर करणार असल्याचे समजताच कृष्णाकाठच्या ग्रामस्थांनी भिलवडी पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली होती. पोलिसप्रमुख शिंदे म्हणाले की, घटना घडल्यानंतर कृष्णाकाठच्या गावातील ग्रामस्थांनी पोलिसांना चांगले सहकार्य केले. त्यांनी दाखविलेल्या संयमामुळे तपासकामावर लक्ष केंद्रित करता आले.
पथकाचे कौतुक
अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख कृष्णकांत उपाध्याय, उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, अमरसिंह निंबाळकर, सुवर्णा पत्की, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक बाजीराव पाटील, गुंडाविरोधी पथकाचे निरीक्षक विश्वनाथ घनवट, तासगावचे मिलिंद पाटील, भिलवडीचे सुनील हारूगडे यांच्या पथकांनी तपासात सहभाग घेतला होता. पथकाचे पोलिसप्रमुखांनी कौतूक केले.

Web Title: 'That girl murderer from the crime!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.