मांत्रिकाच्या अघोरी उपचारातून मुलीची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 04:53 PM2020-01-09T16:53:54+5:302020-01-09T16:55:59+5:30
भूतबाधा झाल्याचे सांगत मांत्रिकाने शालेय विद्यार्थिनीवर चालविलेल्या अघोरी उपचारातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तिची सुटका केली. सरोज माकडवाले या इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीवर हा प्रसंग बेतला होता. डॉ. राहुल मोरे यांनी तिच्यावर मोफत उपचार केले.
कोल्हापूर : भूतबाधा झाल्याचे सांगत मांत्रिकाने शालेय विद्यार्थिनीवर चालविलेल्या अघोरी उपचारातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तिची सुटका केली. सरोज माकडवाले या इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीवर हा प्रसंग बेतला होता. डॉ. राहुल मोरे यांनी तिच्यावर मोफत उपचार केले.
सरोजला भूतबाधा झाली म्हणून कुटुंबीयांनी तिच्यावर मांत्रिकाकडून अघोरी उपचार सुरू केले. मांत्रिकाने तिला बेदम मारहाण केली. नंतर ३ तारखेला समाजाच्या मंदिरामध्ये सकाळपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत अन्नपाण्याविना बसवून ठेवले. हा प्रकार तिच्या प्रदीप कुच्चीवाले या विद्यार्थी मित्राने ‘अंनिस’चे नितीन शिंदेंना सांगितला.
शिंदे यांनी तातडीने प्रा. सतीश चौगुले, प्रा. बी. आर. जाधव, प्रा. विष्णू होनमोरे, सईदा चौगुले, समीर चौगुले, अवधूत कांबळे, संजय बनसोडे यांच्यासोबत घटनास्थळी भेट दिली आणि त्या मुलीची चौकशी केली. त्या समाजाला तिच्यावर डॉक्टरांकडून उपचार करून घेण्यास सुचविले. एवढ्यावरच न थांबता ‘अंनिस’ने तिचा उपचाराचा खर्च करण्याचीही तयारी दर्शविली.
मुलीला त्याचदिवशी सायंकाळी डॉ. राहुल मोरे यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यांच्या उपचारानंतर मुलगी मंगळवारी पूर्णत: बरी होऊन घरी गेली. डॉ. मोरे यांनी तिच्यावर मोफत उपचार केले. दरम्यान, माकडवाले समाजाचे प्रबोधन करून मांत्रिकाला समाजामध्ये फिरकू दिले जाणार नाही, असे वदवून घेण्यात आले.