कोल्हापूर विभागात मुलींची बाजी

By admin | Published: August 25, 2016 12:27 AM2016-08-25T00:27:18+5:302016-08-25T00:40:38+5:30

बारावीची फेरपरीक्षा : आॅनलाईन निकाल जाहीर; संकेतस्थळावरुन प्रिंट निघणार

Girls bet on Kolhapur division | कोल्हापूर विभागात मुलींची बाजी

कोल्हापूर विभागात मुलींची बाजी

Next

कोल्हापूर : यावर्षी पहिल्यांदाच झालेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा आॅनलाईन निकाल बुधवारी दुपारी एक वाजता महामंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर झाला. यात कोल्हापूर विभागाचा निकाल २८.१२ टक्के लागला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत जुलै २०१६ मध्ये ही फेरपरीक्षा घेण्यात आली. फेरपरीक्षेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा १०.२२ टक्के जास्त आहे, अशी माहिती परीक्षा मंडळाचे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष व्ही. बी. पायमल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पायमल म्हणाले, फेरपरीक्षेसाठी कोल्हापूर विभागात ११ हजार ८१५ विद्यार्थी बसले होते. त्यांपैकी ३ हजार २७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी २८.१२ टक्के आहे. यंदा विज्ञान शाखेचा निकाल २९.१६ टक्के, कला शाखेचा निकाल २६.६० टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ३१.२६ टक्के आणि एमसीव्हीसी शाखेचा निकाल ३२.५९ टक्के लागला.
कोल्हापूर विभागात कोल्हापूर जिल्हा ३०.३८ टक्क्यांसह प्रथम आहे. सांगली जिल्हा २८.७५ टक्क्यांसह द्वितीय तर तिसऱ्या क्रमांकावर २५.१३ टक्क्यांसह सातारा जिल्हा आहे.
संकेतस्थळावरून गुणांची प्रिंट काढता येणार आहे. गुणपत्रिकांचे वाटप संबंधित कनिष्ठ महाविद्यालयामार्फत करण्यात येईल, त्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. याप्रसंगी विभागीय सचिव व्ही. पी. कानवडे, शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी, डी. वाय. कदम उपस्थित होते.


कॉपी प्रकरण नाही
मंडळाने राबविलेल्या कॉपीमुक्त अभियान कार्यक्रमाचा सकारात्मक परिणाम झाला आहे. यंदा एकही कॉपी प्रकरण आढळून आले नाही. गतवर्षी झालेल्या सप्टेंबर-आॅक्टोबर २०१५ मध्ये चार गैरप्रकार आढळून आले होते.
गुणपडताळणी : दि. २५ आॅगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत विहित नमुन्यातील अर्जासोबत संकेतस्थळावरील स्वसाक्षांकित गुणपत्रिकेची प्रत जोडून विहित शुल्कासह विभागीय मंडळाकडे अर्ज सादर करावेत.
उत्तरपत्रिकेची छायाप्रत : दि. २५ आॅगस्ट ते १४ सप्टेंबरपर्यंत अर्जासोबत संकेतस्थळावरील स्वसाक्षांकित गुणपत्रिकेची प्रत जोडून विहित शुल्कासह विभागीय मंडळाकडे अर्ज सादर करावेत. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी प्रतिविषय ४०० रुपये शुल्क निश्चित केले आहे.

कोल्हापूर विभागाचा निकाल असा
कोल्हापूर - ३०.३८ टक्के
सांगली - २८.७५ टक्के
सातारा - २५.१३ टक्के

Web Title: Girls bet on Kolhapur division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.