फेसबुकच्या माध्यमातून विवाह करून तरुणीची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:10 AM2018-10-26T11:10:29+5:302018-10-26T11:11:36+5:30
फेसबुकच्या माध्यमातून विवाह करून फसवणूक केल्याप्रकरणी पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील तरुणावर लक्ष्मीपुरी पोलिसांत बुधवारी (दि. २४) गुन्हा दाखल झाला. विपुल संजय झगडे (वय ३०, रा. लाटवडे रोड) असे या संशयित तरुणाचे नाव आहे. संबंधित तरुणीने याबाबत न्यायालयात फिर्याद दिली.
कोल्हापूर : फेसबुकच्या माध्यमातून विवाह करून फसवणूक केल्याप्रकरणी पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील तरुणावर लक्ष्मीपुरी पोलिसांत बुधवारी (दि. २४) गुन्हा दाखल झाला. विपुल संजय झगडे (वय ३०, रा. लाटवडे रोड) असे या संशयित तरुणाचे नाव आहे. संबंधित तरुणीने याबाबत न्यायालयात फिर्याद दिली.
पोलिसांनी सांगितले की, मूळ पेठवडगाव व सध्या लक्ष्मीपुरी परिसरात राहत असलेल्या या तरुणीची विपुल झगडेबरोबर फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. त्यातून या दोघांनी २८ मार्च २०१६ ला कोल्हापूर येथील नोंदणी कार्यालयात विवाह कायद्यानुसार विवाह केला. संबंधित तरुणी ही शिक्षण घेत असल्याने ती पती विपुल झगडेबरोबर नांदावयास गेली नाही.
या तरुणीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने विपुलबाबत चौकशी केली असता, त्याने मिळकतीबाबत सांगितलेली सर्व माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले. आपली फसवणूक झाल्याचे या तरुणीच्या लक्षात आले. त्यानंतर तिने नोंदणी कार्यालयात जाऊन विवाहाची कागदपत्रे मिळविली. त्यावेळी या तरुणीला आपला कायदेशीर विवाह झाल्याचे लक्षात आले.
या प्रकाराने तरुणीने विपुलची भेट घेऊन विवाह रद्द करण्याविषयी विनंती केली असता त्याने विवाह रद्द करायचा नाही, असे सांगून तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच गावामध्ये बदनामी करून तरुणी व तिच्या घरच्यांविरुद्ध पोलिसांत खोट्या तक्रारी दिल्या. अखेर या त्रासास कंटाळून या तरुणीने न्यायालयात फिर्याद दिली. या प्रकरणी संशयित विपुल झगडेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. २८ मार्च २०१६ ते २०१८ च्या दरम्यान हा प्रकार घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.