मुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा; झारखंड, हरियाणा उपांत्य फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:36 AM2019-04-27T11:36:54+5:302019-04-27T11:38:30+5:30
सुमती कुमारी, अस्थॉम ओरॉन, कुवारी इंदवर यांच्या गोलच्या जोरावर झारखंड फुटबॉल असोसिएशनने बलाढ्य मणिपूर फुटबॉल असोसिएशनचा; तर हरियाणा फुटबॉल असोसिएशनने गतविजेत्या तमिळनाडू फुटबॉल असोसिएशनचा ४-० असा पराभव करीत हिरो चषक कनिष्ठ मुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
कोल्हापूर : सुमती कुमारी, अस्थॉम ओरॉन, कुवारी इंदवर यांच्या गोलच्या जोरावर झारखंड फुटबॉल असोसिएशनने बलाढ्य मणिपूर फुटबॉल असोसिएशनचा; तर हरियाणा फुटबॉल असोसिएशनने गतविजेत्या तमिळनाडू फुटबॉल असोसिएशनचा ४-० असा पराभव करीत हिरो चषक कनिष्ठ मुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत शुक्रवारी सकाळच्या सत्रात झारखंड व मणिपूर फुटबॉल असोसिएशनच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामना झाला. सामन्यांच्या प्रारंभापासून झारखंड संघाकडून अमिषा, सलिनाकुमारी, अस्थॉम ओरॉन, सुमती कुमारी यांनी आक्रमक वेगवान चाली रचल्या.
यात दुसऱ्याच मिनिटाला झारखंड संघास यश मिळाले. त्यांच्या कुवारी इंदवरने गोल करीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर २९ व्या मिनिटाला सुमती कुमारी हिने गोल करीत ही आघाडी २-० अशी भक्कम केली. उत्तरार्धात ४८ व्या मिनिटास अस्थाम ओरॉन हिने गोल करीत संघाला ३-० अशी आघाडी मिळवून दिली.
सामना संपण्यास तीन मिनिटे बाकी असताना सुमती कुमारी हिने गोल करीत संघाची आघाडी ४-० अशी भक्कम करीत संघास विजय मिळवून दिला. मणिपूरकडून एस. लिंडाकोम, हेमाम सिल्की, ठोकचाँग मार्टिना, गाशीपमदेवी, शांघोल देवी यांनीही चांगला खेळ केला; मात्र, झारखंडच्या आक्रमक खेळीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.
दुसऱ्या सामन्यात गतविजेत्या तमिळनाडू फुटबॉल असोसिएशनच्या संघास हरियाणा फुटबॉल असोसिएशनकडून ४-० असा पराभवाचा धक्का बसला. हरियाणाकडून ३१ व्या मिनिटास बाली हिने गोल करीत संघाचे खाते उघडले. सामन्यात बरोबरी साधण्याचे तमिळनाडूकडून जोरदार प्रयत्न झाले.
तमिळनाडूच्या मरिमा, प्रियदर्शनी, पुजी यांनीही आक्रमक व वेगवान चाली रचल्या; मात्र, त्यांना बरोबरी साधता आली नाही. उत्तरार्धात हरियाणाकडून ममता हिने ४९ व्या मिनिटास गोल करीत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ६४ व ९० व्या मिनिटानंतरच्या जादा वेळेत गोल करीत संघाची आघाडी ४-० अशी भक्कम करीत संघास विजयासह उपांत्य फेरीत पोहोचविले.