बारावी परिक्षेत कोल्हापूर विभागात मुलींची बाजी
By admin | Published: May 30, 2017 04:07 PM2017-05-30T16:07:40+5:302017-05-30T16:07:40+5:30
मुलांपेक्षा उत्तीर्णचे प्रमाण १०.४९ टक्क्यांनी जादा : सातारा जिल्हा ‘अव्वल’
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. ३0 : उच्च शिक्षण क्षेत्रातील प्रवेशाचा पहिला टप्पा असणाऱ्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी आॅनलाईन जाहीर झाला. कोल्हापूर विभागाचा एकूण निकाल ९१.४० टक्के लागला आहे. राज्यात हा विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. विभागात उत्तीर्णतेमध्ये ९५.४१ टक्क्यांसह मुलींनी आघाडी घेतली आहे. हे प्रमाण मुलांच्या उत्तीर्णतेच्या प्रमाणात १०.४९ टक्क्यांनी अधिक आहे. विभागामध्ये सातारा जिल्हा ९१.६७ टक्क्यांसह प्रथम क्रमांकावर आहे. कोल्हापूर जिल्हा ९१.६३ टक्क्यांसह द्वितीय, तर सांगली ९०.७९ टक्क्यांनी तिसऱ्या स्थानी आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय अध्यक्ष व्ही. बी. पायमल यांनी विभागाच्या निकालाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सचिव व्ही. पी. कानवडे, सहाय्यक सचिव बी. एस. शेटे, साताऱ्याच्या माध्यमिक उपशिक्षणाधिकारी एस. जी. मुजावर, सांगलीचे माध्यमिक शिक्षणाधिकारी, एम. जे. चोथे, कोल्हापूरचे शिक्षण सहसंचालक एन. डी. पारधी, आदी उपस्थित होते.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कोल्हापूर विभागाच्या निकालात ३. ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावर्षी विभागातील ७६३ कनिष्ठ महाविद्यालयामधून १,२६,७६१ मुला-मुलींनी परीक्षा दिली. यापैकी १, १५,८६३ जण उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ९१.४० आहे. यात ७६०१३ मुलांनी आणि ५५७५७ मुलींनी परीक्षा दिली. यातील ६४५४७ मुले उत्तीर्ण झाले असून त्यांचे प्रमाण ८४.९२ टक्के, तर ५३१९५ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे प्रमाण ९५.४१ टक्के आहे. सातारा जिल्ह्यातील २३३ कनिष्ठ महाविद्यालयांतील परीक्षा दिलेल्या ३८६५९ विद्यार्थ्यांपैकी ३५४३८ जण उत्तीर्ण झाले आहेत. त्याची टक्केवारी ९१.६७ इतकी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २७७ महाविद्यालयामधील ५२११४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील ४७७५१ जण उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ९१. ६३ आहे.
सांगली जिल्ह्यातील २५३ कनिष्ठ महाविद्यालयांतील ३५९८८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातील ३२६७४ विद्यार्थी यशस्वी ठरले आहे. त्यांची टक्केवारी ९०.७९ आहे. कोल्हापूर विभागामध्ये गेल्यावर्षी तिसऱ्या स्थानी असलेल्या सातारा जिल्ह्याने यंदा अव्वल स्थान पटकविले. मागील वर्षी प्रथम क्रमांकांवर असलेला कोल्हापूर जिल्हा आणि द्वितीय क्रमांकावरील सांगली जिल्हा यावर्षी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहे. गुणपत्रिकांचे वाटप दि. ९ जूनला दुपारी तीन वाजता करण्यात येणार आहे.
विभागाचा निकाल दृष्टिक्षेपात
*कोल्हापूर विभागाचा एकूण : ९१.४० टक्के
*यावर्षीच्या निकालात ३. ३० टक्क्यांची वाढ *
विभागातील ३४७ विद्यार्थ्यांना ग्रेस गुण *
९३ विद्यार्थ्यांच्या श्रेणी सुधारली *
गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या २५ परीक्षार्थींवर कारवाई
पाठ्यपुस्तकांतील बदलाची प्रक्रिया सुरू
सर्व घटकांचे योगदान उपयुक्त ठरले गेल्या वर्षी कोल्हापूर विभागाचा निकाल ४.०३ टक्क्यांनी घटला होता. त्याची कारणे शोधून शाळा, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक अशा सर्व घटकांनी टक्केवारी वाढीसाठी योगदान दिले. ते यावर्षी निकालाची टक्केवारी वाढीसाठी उपयुक्त ठरले आहे. अभ्यासक्रम बदलाच्या अनुषंगाने पाठ्यपुस्तकांतील बदलाची प्रक्रिया सुरू असल्याचे विभागीय अध्यक्ष पायमल यांनी सांगितले.