प्रेमप्रकरणातून मुलीच्या नातेवाइकांचा मुलाच्या घरात घुसून हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:23 AM2021-03-28T04:23:52+5:302021-03-28T04:23:52+5:30
कोल्हापूर : प्रेमप्रकरणातून मुलगी मुलाच्या घरी राहत असल्याच्या रागातून तिच्या नातेवाइकांनी मुलाच्या घरावर हल्ला केल्याची घटना घडली. मुलीच्या नातेवाइकांनी ...
कोल्हापूर : प्रेमप्रकरणातून मुलगी मुलाच्या घरी राहत असल्याच्या रागातून तिच्या नातेवाइकांनी मुलाच्या घरावर हल्ला केल्याची घटना घडली. मुलीच्या नातेवाइकांनी घरात घुसून मुलगा व मुलीसह तिघांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांना लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण केली. हल्ल्यात तिघे जण गंभीर जखमी झाले. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास रविवार पेठेत भोई गल्लीतील चांदणी चौकात घडलेल्या घटनेमुळे गोंधळ उडाल्याने संतप्त नागरिकांनी हल्लेखोरांच्या चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्या.
हल्ल्यात मुलगा सिद्धेश राजू सावंत (वय २१), मुलाची आई सुरेखा सावंत (दोघेही रा. रा. भोई गल्ली), मुलगी समीरा कय्यूम सवार (वय २१, रा. मौजे वडगाव, ता. हातकणंगले) हे तिघे जखमी झाले. जखमी मुलीने लक्ष्मीपुरी पोलिसांत आपली आई, वडील, भावांसह एकूण सहा जणांविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार मुलीचे वडील कय्यूम बाबा सवार (वय ४०), आई दिलशाद सवार (४०), भाऊ इकबाल सवार (२४, सर्व मौजे वडगाव, ता. हातकणंगले. मूळ गाव-रा. इटकरे, ता. वाळवा, जि. सांगली), मावशी वहीदा आयूब जमादार (रा. पेठगोळेवाडी, पालकमळा, ता. वाळवा, जि. सांगली), चुलतमामा दस्तगीर हमजा मुल्लाणी, आजी बेबी अब्बास मुल्लाणी (५५, रा. इटकरे, ता. वाळवा) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवार पेठेतील सिद्धेश सावंत व मौजे वडगाव येथील समीरा सवार यांचे प्रेमसंबध जुळले होते. गेली महिनाभर मुलगी समीरा ही स्वत:च्या मर्जीने सिद्धेशच्या घरी राहत होती. समीराच्या तिच्या इच्छेविरुद्ध दुसऱ्या मुलांसोबत लग्न करून देण्याबाबत वडिलांचे प्रयत्न होते. त्यासाठी घरच्यांनी यापूर्वी तिला दोन वेळा घरी नेण्याचा प्रयत्न केला होता.
शनिवारी दुपारी तिचे आई-वडील व नातेवाईक एका चारचाकी वाहनातून अचानक सिद्धेशकडे आले. त्यांनी सिद्धेशच्या घरात घुसून त्याच्यासह मुलगी समीरा, आई सुरेखा सावंत यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांना लाथाबुक्क्यांनी व दगडी फरशीने मारहाण केली. यावेळी आरडा-ओरडा झाल्याने नागरिक जमा झाले. त्यावेळी समीराला नातेवाईक जबरदस्तीने वाहनात घालून जात असताना नागरिकांनी त्यांचे वाहन आडवले. तसेच त्या वाहनाच्या काचा फोडल्या. पोलीसही तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी मुलीच्या सहा नातेवाइकांना ताब्यात घेतले. या हल्ल्यात सिद्धेश, त्याची आई सुरेखा सावंत व समीरा हे तिघे जखमी झाले. याबाबत रात्री उशिरा सहा जणांविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.