‘जीआयएस मॅपिंग’चे काम रखडले
By admin | Published: May 18, 2017 01:05 AM2017-05-18T01:05:39+5:302017-05-18T01:05:39+5:30
दीड महिन्याने मुदत संपणार : काम फक्त २५ टक्केच, मनपा अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : घरफाळ्याची आकारणी चुकविणाऱ्या मिळकतधारकांचा शोध घेण्यासाठी महानगरपालिकेचे माजी आयुक्त पी. शिवशंकर यांनी ‘जीआयएस’ मॅपिंग प्रणालीचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला खरा पण या सर्वेक्षणाचे काम रखडले आहे. त्यावर मनपाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहिले नसल्याचे स्पष्ट झाले. एक चांगल्या कामाचेही तीन तेरा कसे होतात याचे जीआयएस मॅपिंग एक उदाहरण आहे.
कोल्हापूर शहराचा विस्तार झपाट्याने होत असून वाढणाऱ्या मिळकतींची नोंद महापालिकेच्या घरफाळा विभागात तितक्याच गतीने होत नाही. वर्षानुवर्षे अनेक मिळकतींना त्यामुळे घरफाळा लागू झाला नसल्याने महापालिकेचे उत्पन्न बुडत आहे. ही बाब लक्षात येताच तत्कालीन आयुक्त पी. शिवशंकर यांनी शहर हद्दीतील सर्व मिळकतींचे जीआयएस मॅपिंग प्रणालीचा वापर करून सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सायबर इन्फोटेक अॅन्ड कंपनी (ठाणे) यांना काम देण्यात आले.
शहरातील सर्व मिळकतींच्या सर्वेक्षणाचे काम निविदेतील अटीप्रमाणे चौदा महिन्यांत पूर्ण करायचे होते, परंतु मुदत संपण्यास अवघ्या दीड महिन्याचा अवधी राहिला असताना १ लाख ३७ हजारांपैकी केवळ १२ हजार ३३५ मिळकतींचे सर्वेक्षण पूर्ण झाले. यावरूनच या कामाची गती स्पष्ट झाली आहे. प्रारंभी ठेकेदारास सी व डी वॉर्डातील सर्वेक्षण करण्यास सांगण्यात आले होते. दोन वॉर्ड दाट लोकवस्तीचे आहेत, तरीही काम करण्यास विलंब होत आहे. जर १२ हजार ३३५ मिळकतींना एक वर्ष लागणार असेल तर १ लाख ३७ हजार मिळकतींचे सर्वेक्षण पूर्ण होण्यास किती वर्षे लागतील, असा प्रश्नही त्यातून निर्माण झाला आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वेक्षणाचे काम घेतलेल्या ठेकेदारावर नगरसेवकांनी आरोप केले होते. मिळकतधारक आणि ठेकेदार कंपनीचे कर्मचारी तोडपाणी करून पैसे कमावत असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक राहुल चव्हाण यांनी केला होता. त्यावेळी या कामावर बहुतांशी सर्वच सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तरीही प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या कामावर सध्यातरी कोणाचे नियंत्रण नसल्याचे दिसते.