घरेलू कामगारांना १० हजार सन्मानधन द्या : कामगार मंत्र्यांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 11:55 AM2020-05-05T11:55:58+5:302020-05-05T12:09:58+5:30
आताच्या आपत्तीजन्य परिस्थितीत त्याची या महिलांना गरज आहे. त्यामुळे हे सन्मानधन त्वरीत द्यावे.
कोल्हापूर : घरेलू कामगारांसाठी मंजूर असलेले वार्षिक १० हजार रुपये सन्मानधन आतातरी द्यावे. कारण लॉकडाऊनच्या कालावधीत हाताला काम नसल्याने त्याची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे ही रक्कम त्वरीत द्यावी, अशी मागणी जनता दल (धर्मनिरपेक्ष) चे राज्य महासचिव शिवाजीराव परुळेकर यांनी केली. याबाबतचे निवेदन त्यांनी कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना मेलद्वारे पाठविले.
निवेदनात म्हटले आहे की, असंघटित व अत्यल्प उत्पन्न असणाऱ्या घरेलू कामगार महिला या दररोज पायपीट करून अनेक घराची धुणे-भांडी करीत असते. यातून मिळणा-या पैशातून तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. त्यांच्यासाठी दिवंगत कॉ. गोविंद पानसरे व डॉ. बाबा आढाव यांनी अनेक वर्षे लढा दिला. त्या पार्श्वभूमीवर २००८ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील व कामगार मंत्री नवाब मलिक यांनी पानसरे व आढाव यांच्याशी चर्चा केली होती
यानंतर घरेलू कामगार महिलांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन केले व ५५ वर्षांवरील घरेलू कामगार महिलांसाठी वार्षिक १० हजारांचे सन्मानधन सुरू केले. ते काही महिलांनाच व काही काळच सुरू राहिले. आताच्या आपत्तीजन्य परिस्थितीत त्याची या महिलांना गरज आहे. त्यामुळे हे सन्मानधन त्वरीत द्यावे.