दुष्काळग्रस्तांना हेक्टरी ५० हजार मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 10:36 AM2019-02-27T10:36:41+5:302019-02-27T10:38:25+5:30
संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना सरकार अद्याप बघ्याची भूमिका घेत असून, दुष्काळग्रस्तांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, अशी महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटी किसान सेलच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. सेलचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन दिले.
कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना सरकार अद्याप बघ्याची भूमिका घेत असून, दुष्काळग्रस्तांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, अशी महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटी किसान सेलच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. सेलचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन दिले.
संजय पाटील म्हणाले, दुष्काळावर उपायासाठी सरकार अजून वाट पहात आहे. जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. फळबागा जळून चालल्या आहेत. चारा छावण्यांना तातडीने मंजुरी देण्याची गरज आहे. मंजुरीसाठी पालकमंत्र्यांच्या मान्यतेची अट आहे, ती रद्द करावी.
राज्यातील उन्हाळी कांदा उत्पादक दरात घसरण झाल्याने अडचणीत सापडला आहे. त्यांना पाचशे रुपये अनुदान द्यावे, त्याचबरोबर मध्यप्रदेशच्या धर्तीवर कांद्यासाठी भावांतर योजना लागू करावी, अशी मागणीही पाटील यांनी केली. यावेळी संपतराव पाटील, सागर भोगम, योगेश हात्तलके, दीपक कांबळे, अतुल कांबळे, साईराज पाटील, निवास भारमल, युवराज गोसावी, राजाराम गोसावी, आदी उपस्थित होते.