जिल्हा बँकेला गतवैभव देऊ
By admin | Published: April 28, 2015 12:46 AM2015-04-28T00:46:18+5:302015-04-28T00:46:29+5:30
हसन मुश्रीफ : जिल्हा बँकेच्या ठरावधारक मतदारांचा कागलमध्ये मेळावा
कागल : सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंहराजेंच्या निधनामुळे जिल्ह्याच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. ती काही प्रमाणात भरून काढण्याची जबाबदारी कागल तालुक्यावर आली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक चालविण्याचे मोठे आव्हान आहे. म्हणून सर्वसमावेशक पॅनेल केले आहे. कोणतीही भिडभास्त न ठेवता बँक काटेकोरपणे चालवून तिला गतवैभव प्राप्त करून देऊ, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.येथील अलका शेतीफार्मवर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात ठरावधारक मतदारांचा मेळावा सोमवारी घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ‘गोकुळ’चे नूतन संचालक रणजितसिंह पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवराज पाटील, नगराध्यक्षा आशाकाकी माने, डी. डी. चौगुले, रंगराव पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार मुश्रीफ म्हणाले, विधानसभा निवडणुकीत मुरगूडच्या पाटील बंधूंनी आमच्यासाठी जिवाचे रान केले, म्हणून त्यांना ‘गोकुळ’द्वारे साथ द्यायचीच ही भूमिका निश्चित होती. जिल्हा बँकेत सर्वसमावेशक पॅनेल करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. त्याला जिल्ह्यातील नेत्यांनी पाठिंबा दिला. त्यातून प्रा. संजय मंडलिकांची उमेदवारी आमच्या पॅनेलमधून निश्चित झाली आहे. यामुळे आम्ही पाटील गटाला कधीही अंतर देणार नाही. समरजितसिंह घाटगे यांनाही भेटणार आहे.
भैया माने म्हणाले, एक कार्यकर्ता म्हणून मला संधी मिळाली आहे. मुश्रीफ यांच्या पुढाकारातून विविध पक्ष-विचारांचे लोक बँक वाचविण्यासाठीच एकत्र आले आहेत. रणजितसिंह पाटील म्हणाले, गोकुळ दूध संघात यापूर्वी जसे काम केले, तसे राजकारणविरहित काम करीत राहू. कोणतेही तेथे राजकारण करणार असेल, तर जाहीररीत्या विरोधाची भूमिका घेऊ.
शामराव पाटील यांनी स्वागत, प्रवीणसिंह भोसले यांनी प्रास्ताविक केले. विकास पाटील (कुरकलीकर) यांनी आभार मानले.
यावेळी बाळासाहेब तुरंभे, आनंदराव अस्वले, प्रकाश गाडेकर, शामराव घाटगे, अरुण भोसले, रघुनाथ जकाते, इरफान मुजावर, रमेश तोडकर, आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)