कोल्हापूर विभागातील उसाची थकीत बिले व्याजासह द्या, ‘बळीराजा’ची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:10 PM2018-09-26T12:10:30+5:302018-09-26T12:25:57+5:30
कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी मागील दोन-तीन हंगामात गाळप केलेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. त्यांच्यावर कारवाई करून व्याजासह उसाची बिले द्यावीत, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे केली.
कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी मागील दोन-तीन हंगामात गाळप केलेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. त्यांच्यावर कारवाई करून व्याजासह उसाची बिले द्यावीत, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे केली. संबंधित कारखान्यांवर उचित कार्यवाही करण्याबाबतचा अहवाल प्रादेशिक साखर सहसंचालकांनी साखर आयुक्तांकडे पाठविला आहे.
सांगली जिल्ह्यातील माणगंगा साखर कारखान्याने २०१५-१६ व २०१६-१७ या हंगामातील पहिले बिलही दिलेले नाही. शिवाजी केन प्रोसेर्स, शिराळा यांनीही शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत. महाकाली साखर कारखान्याकडून दोन्ही हंगामातील उत्पादकांचे पैसे मिळालेले नाहीत. असे अनेक कारखाने आहेत, त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिलेले नाहीत.
या कारखान्यांकडून शेतकऱ्यांना पैसे द्या अथवा शासनाने विशेष निधीतून पैसे द्यावेत. १४ दिवसांत उसाची बिले देणे कायद्याने बंधनकारक आहे; पण दोन दोन वर्षे पैसे देणार नसतील, तर सरकारने कारवाई करावी व व्याजासह शेतकऱ्यांना पैसे द्यावेत, अशी मागणी बळीराजा संघटनेच्या वतीने केली आहे. याबाबत उचित कार्यवाही करण्याबाबत साखर सहसंचालकांनी साखर आयुक्तांना अहवाल सादर केला आहे.