कमिटमेंट द्या, बंड मागे घेऊ
By admin | Published: February 5, 2016 01:07 AM2016-02-05T01:07:04+5:302016-02-05T01:07:57+5:30
सुरेश आवटींची भूमिका : काँग्रेस नेत्यांची आज बैठक; बंडखोरीवर खल सुरू
सांगली : महापौर-उपमहापौर निवडीवरून काँग्रेसमध्ये झालेले बंड शमण्याच्या मार्गावर आहे. दहा महिन्यांनंतर सुरेश आवटी यांना महापौर करण्याचा शब्द नेत्यांनी द्यावा, मगच बंड मागे घेऊ, अशी भूमिका बंडखोर गटाने घेतली आहे. या भूमिकेला काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांनी हिरवा कंदील दाखविल्याचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले. आज, शुक्रवारी काँग्रेस नेत्यांची बैठक होत असून, त्यात अधिकृत घोषणा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापौरपदासाठी हारुण शिकलगार, उपमहापौर पदासाठी विजय घाडगे यांच्या नावावर काँग्रेसच्या नेत्यांनी शिक्कामोर्तब करताच सुरेश आवटी गटाने बंडाचे निशाण फडकविले होते. या गटाकडून निरंजन आवटी व प्रदीप पाटील यांनी अर्ज दाखल केले होते. काँग्रेसमध्ये बंड झाल्याने दगाफटका होऊ नये यासाठी नगरसेवकांना सहलीवर पाठविण्यात आले आहे. दोन्ही गटाचे नगरसेवक सध्या सांगलीबाहेर असल्याने महापालिका ओस पडली आहे.
सुरेश आवटी गटाची समजूत काढण्याचे प्रयत्न गुरुवारी सकाळपासून सुरू झाले. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आवटी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत चर्चा केली. आवटी यांनी आगामी महापौरपद आपल्याला देण्याचे नेत्यांनी जाहीर करावे, मगच बंड मागे घेऊ, अशी भूमिका घेतली. सध्या हारुण शिकलगार व विजय घाडगे यांना दहा महिन्यांसाठी महापौर, उपमहापौरपद देण्यात आले आहे. त्यानंतर खऱ्याअर्थाने आवटी यांचाच नंबर होता. तशी चर्चाही काँग्रेस नेत्यांत झाली होती; पण कमिटमेंट दिल्याशिवाय माघार घेणार नाही, असा पवित्रा आवटी गटाने घेतला आहे. त्यात काँग्रेसमधील फाटाफुटीला गटनेते किशोर जामदार हेच जबाबदार असून, त्यांचा राजीनामा घेण्याचा आग्रह धरला आहे. पण, त्यावर आताच चर्चा होणार नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. शनिवारी महापौर, उपमहापौर निवड होणार आहे. तत्पूर्वी शुक्रवारी काँग्रेसचे आमदार पतंगराव कदम, विश्वजित कदम, जयश्रीताई पाटील, पक्षनिरीक्षक प्रकाश आवाडे, आमदार आनंदराव पाटील, विशाल पाटील यांची बैठक होत आहे. या बैठकीत आवटींच्या मागणीवर चर्चा होणार आहे. तसे आश्वासन पृथ्वीराज पाटील यांनी त्यांना दिले आहे.