विनाखंडित वीज द्या, अन्यथा परिणाम भोगा
By admin | Published: May 4, 2017 01:02 AM2017-05-04T01:02:28+5:302017-05-04T01:02:28+5:30
सतेज पाटील : महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा; शेतकऱ्यांना संयम सुटू न देण्याचे आवाहन
कोल्हापूर : वीज महामंडळाच्या गलथान कारभाराचा शेती आणि शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. वारंवार होणाऱ्या भारनियमनामुळे जिल्ह्यातील शेती करपत आहे. महावितरणने लक्ष देऊन बारा तास विनाखंडित वीजपुरवठा करावा; अन्यथा शेतकऱ्यांचा संयम सुटल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. शेतकऱ्यांचे लाखोंच्या संख्येने मोर्चे निघतील, असा इशारा माजी मंत्री व आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी दिला.
शेतीपंप वीजग्राहकांवर लादलेली विजेची दरवाढ कमी करावी व बारा तास अखंडित वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी येथील ताराबाई पार्कमधील महावितरणच्या मुख्य कार्यालयावर बुधवारी दुपारी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून निवेदन दिले. याप्रसंगी ते बोलत होते.
आमदार पाटील म्हणाले, जिल्ह्यात पाणीसाठा चांगला असल्यामुळे शेतीही चांगली बहरली आहे. मात्र, महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतीला वेळेत पाणी देता येणे शेतकऱ्यांना शक्य नाही. याबाबत वारंवार तक्रार करूनही महावितरणचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. आता मात्र आठ दिवसांत त्यांनी या सर्व प्रश्नांवर तोडगा काढावा, अन्यथा महावितरण कार्यालयावर लाखोंचा मोर्चा काढला जाईल.
आमदार पाटील म्हणाले, वीज नाही आणि वीजबिल मात्र भरमसाट वाढविले आहे. वीज दरवाढ तत्काळ रद्द झालीच पाहिजे. शेतीला चालना मिळायला हवी, ही घोषणा करणारे सरकार शेतकऱ्यांना वीज परवाने वेळेत मिळू देत नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ४१७५ परवाने प्रलंबित आहेत. हे परवाने तत्काळ मिळाले पाहिजेत.
यावेळी, उपमहापौर अर्जुन माने, करवीर पंचायत समिती सभापती प्रदीप झांबरे, गगनबावडा समिती सभापती मंगल कांबळे, बाजार समिती सदस्य विलास साठे, दशरथ माने, जिल्हा परिषद सदस्य बजरंग पाटील उपस्थित होते.
शेतकऱ्यांना भटकण्याची वेळ
गगनबावडा, करवीर, आजरा, गडहिंग्लज या तालुक्यांतील शेतकऱ्यांना विजेसाठी दाही दिशा भटकण्याची वेळ आली आहे. खांबावरील फ्युज गेल्यानंतर ती शेतकऱ्यांना बदलावी लागते, यासारखे दुर्दैव नाही, असेही ते म्हणाले.
तरीही वीज जाते कोठे?
एकीकडे शंभर टक्के वीजबिलाची वसुली असणाऱ्यांना चोवीस तास वीज द्यायची घोषणा करायची आणि सात ते आठ तासच द्यायची. यातही एक-दोन तास भारनियमन करून शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहायचा, हा खोडसाळपणा आता बंद केला पाहिजे. भाजप सरकार एकीकडे बारा तास वीज देण्याची घोषणा करीत आहे. राज्यात कोणताही नवीन उद्योग आलेला नाही. तरीही निर्मिर्ती होणारी वीज जाते कुठे? असा सवालही सतेज पाटील यांनी केला.