लवकरात लवकर कर्जमाफी द्या -शिवसेनेची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 01:23 AM2017-10-31T01:23:24+5:302017-10-31T01:25:47+5:30
कोल्हापूर : शेतकºयांना लवकरात लवकर कर्जमाफी न दिल्यास भाजपच्या मंत्र्यांना सळो की पळो करून सोडू, असा इशारा शिवसेनेच्यावतीने सोमवारी दिला.
कोल्हापूर : शेतकºयांना लवकरात लवकर कर्जमाफी न दिल्यास भाजपच्या मंत्र्यांना सळो की पळो करून सोडू, असा इशारा शिवसेनेच्यावतीने सोमवारी दिला. जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर निदर्शने करत फसवी कर्जमाफी केल्याच्या निषेधार्थ प्रतीकात्मक मुख्यमंत्र्यांची पूजा करून निषेध करण्यात आला.
दुपारी बाराच्या सुमारास जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक न्यू शाहूपुरीतील जिल्हा निबंधक कार्यालयासमोर एकवटले. काही वेळातच या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची वेशभूषा केलेल्या कार्यकर्त्याचे बोगसप्रमाणपत्रांसह चारचाकी वाहनातून आगमन झाले. सर्वांना अभिवादन करतच ते आंदोलनस्थळी आले. हुबेहुब मुख्यमंत्र्यांसारखा दिसणाºया या कार्यकर्त्याने सर्वांचे लक्ष वेधले. त्यांची महिला शिवसैनिकांनी फुले उधळून व आरती ओवाळून पूजा करत अनोखे आंदोलन करून निषेध नोंदविला.
यानंतर या प्रतीकात्मक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकºयांना बोगस प्रमाणपत्रांचे वाटप केले. मुख्यमंत्री बोगस असून त्यांनी कर्जमाफीची बोगस प्रमाणपत्रे देऊन शेतकºयांची फसवणूक केली आहे. त्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध आहे, अशा शब्दांत संजय पवार, विजय देवणे व मुरलीधर जाधव यांनी समाचार घेतला.
मुख्यमंत्र्यांसह सरकार विरोधात घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने केली. यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी अधिकाºयांना बाहेर बोलविले. त्यानुसार सहाय्यक निबंधक अमित गराडे आंदोलनस्थळी आले. या ठिकाणी त्यांच्यावर कर्जमाफीची स्थिती काय? किती लोकांना कर्जमाफी दिली? अशा प्रश्नांची सरबत्ती करून जाब विचारला. गराडे यांनी लाभार्थ्यांची यादी उपलब्ध झाली असून, त्याची पडताळणी करून संबंधितांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे काम सुरू आहे. यावर सरकारने चुकीचे आकडे देऊन दिशाभूल केल्याचा आरोप करत देवणे यांनी कर्जमाफीबद्दल सरकार फसव्या आकड्यांचा खेळ करत असल्याचे सांगितले.
जिल्ह्यात आॅनलाईन फॉर्म न भरलेल्या शेतकºयांचे आॅफलाईन फॉर्म मुदतवाढ देऊन भरून घ्यावेत. आधारकार्ड नसणारे १२ हजार शेतकºयांचे अर्ज आधारकार्डशिवाय मंजूर करावेत. महाराष्टÑ शासनाचे निकष व त्याची छाननी यातून तांबडा, निळा, पिवळा पट्टा हे निकष त्वरित रद्द करावेत, आदी मागण्या निवेदनांतून करण्यात आल्या आहेत.आंदोलनात सुजित चव्हाण, रवी चौगुले, शिवाजी जाधव, शशी बीडकर, संग्राम कुपेकर, सुनील शिंत्रे, नामदेव गिरी, महादेव गौड, बाजीराव पाटील, शैलेश पुणेकर, शुभांगी पोवार, शांता जाधव, मेघणा पेडणेकर, सुजाता सोहणी, रणजित आयरेकर, आदी सहभागी झाले होते.
महसूलमंत्र्यांचे विधान धक्कादायक
शेतकºयांनी कर्ज भरले नाही, तर सरकार कर्जबाजारी होईल, असे विधान महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी औरंगाबाद येथे केले आहे. ज्यांना सरकार चालवायला दिले त्यांच्याकडूनच असे विधान येत असेल, तर ते धक्कादायक आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असल्याचे देवणे
यांनी सांगितले.