कोल्हापूर विमानतळ भूसंपादनासाठी मुदतवाढ द्या, कृती समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 01:25 PM2023-09-23T13:25:08+5:302023-09-23T13:25:58+5:30
भूसंपादनासाठीची २० सप्टेंबरपर्यंतची वाढीव मुदतही संपल्याने जागामालकांना जागेचा मोबदला कमी मिळणार असल्याकडे खातेदारांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
कोल्हापूर : कोल्हापूरविमानतळ भूसंपादनासाठी मुदतवाढ द्या, विमानतळ प्राधिकरणाला तसा प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी शुक्रवारी विमानतळ कृती समितीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे केली.
आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत बैठक झाली. यावेळी करवीरचे प्रांताधिकारी हरीष धार्मिक, तहसीलदार स्वप्निल रावडे, नायब तहसीलदार संजय मधाळे, तलाठी संतोष भिऊंगडे तसेच विमानतळ कृती समितीचे विलास सोनुले, अरुण सोनवणे, अनिल सोनुले यांच्यासह जमीन मालक उपस्थित होते.
काही खातेदार न्यायालयात गेल्याने विमानतळासाठीच्या ६४ एकर जमिनीपैकी एकतीस एकर जमिनीचे संपादन झाले आहे. संंबंधित खातेदारांना जमिनी ताब्यात देण्याबाबत महसूल विभागाने नोटीस दिल्या आहेत. भूसंपादनासाठीची २० सप्टेंबरपर्यंतची वाढीव मुदतही संपल्याने जागामालकांना जागेचा मोबदला कमी मिळणार असल्याकडे खातेदारांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नांमुळे भूसंपादनासाठी मिळालेली वाढीव मुदतही संपल्याने उर्वरित जमीनमालकांना अपेक्षित रक्कम मिळणार नाही. तसेच २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार या जमिनी ताब्यात घेतल्या जाणार असल्याचे सांगितले. यावर कृती समितीने भूसंपादनासाठीच्या मुदतवाढीसाठी विमानतळ प्राधिकरणाला प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विमानतळ प्राधिकरणाला पाठवू अशी ग्वाही दिली.