मासिक सभेला विस्तार अधिकारी द्या, अन्यथा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:51 AM2021-09-02T04:51:54+5:302021-09-02T04:51:54+5:30
उदगाव : उदगाव (ता.शिरोळ) ग्रामपंचायतीमध्ये जे विषय मासिक सभेत मंजूर केले जातात, ते विषय इतिवृत्तवर घेतले जात नाहीत. त्याचबरोबर ...
उदगाव : उदगाव (ता.शिरोळ) ग्रामपंचायतीमध्ये जे विषय मासिक सभेत मंजूर केले जातात, ते विषय इतिवृत्तवर घेतले जात नाहीत. त्याचबरोबर मंगळवारच्या मासिक सभेत विस्तार अधिकारी म्हणून नेमणूक करावी, अशी मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली होती; मात्र गटविकास अधिकाऱ्यांनी विस्तार अधिकाऱ्यांची नेमणूक न केल्याने स्वाभिमानीच्या सदस्यांनी या सभेकडे पाठ फिरवून बहिष्कार टाकला व पुढील सभेपर्यंत या प्रकरणाची चौकशी करा, अन्यथा शिरोळ पं. स. कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा नऊ सदस्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
उदगाव ग्रा.पं.मध्ये बेकायदेशीर कामावरून २८ ऑगस्ट रोजी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन विस्तार अधिकाऱ्यांची मासिक बैठकीला नेमणूक करावी व ग्रा. पं. सीसीटीव्ही चित्रिकरण काहींच्या मोबाइलवर दिसत होते. याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती; मात्र गटविकास अधिकारी यांनी याची गांभीर्याने दखल घेतली नाही. ग्रामविकास अधिकाऱ्यांनी इतिवृत्तामध्ये खोट्या नोंदी घुसडवल्याचा आरोप केला आहे. तर पुढील सभेच्या आदल्या दिवसापर्यंत इतिवृत्त पाहण्यास न देणे यासह विविध बेकायदेशीर कामे करण्यात येत आहेत, असा आरोप करून स्वाभिमानीच्या नऊ सदस्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला.
निवेदनावर उपसरपंच रमेश मगदूम, ॲड. हिदायत नदाफ, मेघराज वरेकर, सुनिता चौगुले, भारती मगदूम, जगनाथ पुजारी, पूजा जाधव, जोत्स्ना गदगडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो - ३१०८२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - शिरोळ येथे पंचायत समितीच्या अधीक्षिका एस. एम. सानप यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपसरपंच रमेश मगदूम, ॲड. हिदायत नदाफ उपस्थित होते.