ठरलेली उचल द्या; अन्यथा फिरणे मुश्कील करू- राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:28 AM2018-02-18T00:28:46+5:302018-02-18T00:29:01+5:30
हंगाम सुरू होण्यापूर्वीच्या समझोत्यात ठरल्याप्रमाणे उसाची पहिली उचल द्या; अन्यथा साखर कारखानदारांना फिरणे मुश्कील करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
कोल्हापूर : हंगाम सुरू होण्यापूर्वीच्या समझोत्यात ठरल्याप्रमाणे उसाची पहिली उचल द्या; अन्यथा साखर कारखानदारांना फिरणे मुश्कील करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी दिला. साखर कारखानदार व व्यापाºयांच्या संगनमताने साखरेचे दर पाडले गेले; त्यामुळे गेल्या दोन महिन्यांतील साखर खरेदी व विक्रीची चौकशी करण्याची मागणी आयकर विभाग, ‘ईडी’ व ‘सेबी’कडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
साखरेचे दर घसरल्याने कारखान्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबर झालेला समझोता बाजूला ठेवून प्रतिटन २५०० रुपये उचल देण्यास सुरुवात केली आहे. त्याला विरोध करीत कारखान्यांवर कारवाईच्या मागणीसाठी शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चाचे सभेत रुपातंर झाले.
शेट्टी म्हणाले, साखरेचे दर जाणीवपूर्वक पाडले जात असून, कारखान्यांच्या अध्यक्षांनी दुसºयाच्या नावावर कमी दराने साखरेची खरेदी करायची, साठेबाजी करून नंतर चढ्या दराने तिची विक्री करण्याचे उद्योग सुरू आहेत. गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी साखरेचे कृत्रिम दर पाडण्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तीच मागणी आमची असून साखर दराचे तुणतुणे बंद करून प्रसंगी कर्जे काढा; पण ठरल्याप्रमाणे आमचे पैसे द्या.
‘आयकर,’ ‘ईडी,’
‘सेबी’वर चाल करू
येत्या आठ दिवसांत आयकर, ईडी, सेबीकडे जाऊन या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करणार आहे. या विभागांनी कारखानदारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरही चाल करून जाऊ.
- खा. राजू शेट्टी, संस्थापक, स्वाभिमानी शेतकरी संघटना