गिफ्ट देतो म्हणत घातला पत्नीच्या डोक्यात हातोडा
By admin | Published: August 24, 2016 12:59 AM2016-08-24T00:59:00+5:302016-08-24T01:00:20+5:30
पतीचे पलायन : मोरेवाडी येथील घटना
आजरा : तुला एक गिफ्ट देणार आहे; डोळे झाक, असे आपल्या नववधूला सांगत पत्नीने डोळे बंद केल्यावर तिच्या डोक्यात चक्क हातोडा घालून तिला जखमी करण्याचा प्रकार आजरा तालुक्यातील मोरेवाडी येथे घडला. पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पती पांडुरंग विष्णू गावडे याच्याविरुद्ध आजरा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
पांडुरंग हा नववधू संगीता गावडे (वय २४) हिच्यासोबत मोरेवाडीहून आजऱ्याकडे हिरो होंडा मोटारसायकलवरून निघाला होता. मोरेवाडी-वाटंगी रस्त्यावर मध्येच गाडी थांबवून तुला एक गिफ्ट द्यायचे आहे, असे सांगून तिला डोळे मिटावयास लावले. संगीता हिने डोळे मिटल्यावर जवळ असणाऱ्या सॅकमधून हातोडा काढून तिच्या डोक्यावर जोरदार वार केला. यामध्ये संगीता ही जखमी झाली.
आणखी वार करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या पांडुरंग याला विरोध करत तिने जोरदार ओरडण्यास सुरुवात केली. संगीता हिला तिथेच टाकून पांडुरंग याने पळ काढला.
संगीता हिने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पांडुरंग गावडे याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. सहायक फौजदार संजय चव्हाण पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)