आनंदाची बातमी देऊ - मेंढपाळांना कोणतीच अडचण येऊ देणार नाही :- सतेज पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 11:22 AM2020-05-05T11:22:53+5:302020-05-05T11:26:42+5:30
लाखाच्यावर कुटुंबांचा शेळ्या-मेंढ्या पालन हाच मुख्य व्यवसाय आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या काळात हे मेंढपाळ शेळ्या-मेंढ्या घेऊन सांगली,
कोल्हापूर : पावसाळ्यात कमी पावसाच्या प्रदेशात जाणाऱ्या मेंढपाळ धनगर समाजाला काहीही अडचणी येणार नाहीत. मेंढपाळांना लॉकडाऊनमधून वगळण्यासंदर्भात राज्य शासन लवकरच निर्णय घेईल, असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला दिले.
समाजाचे ज्येष्ठ नेते बाबूराव हजारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मोजक्या कार्यकर्त्यांसह पालकमंत्री पाटील यांची भेट घेतली. यावेळी लॉकडाऊनमुळे भविष्यात मेंढपाळांना येणा-या अडचणींविषयी चर्चा झाली. जिल्ह्यात धनगर समाजाची सुमारे पाच लाखांहून अधिक लोकसंख्या आहे. लाखाच्यावर कुटुंबांचा शेळ्या-मेंढ्या पालन हाच मुख्य व्यवसाय आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या काळात हे मेंढपाळ शेळ्या-मेंढ्या घेऊन सांगली,
सातारा, सोलापूर जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्र व विजापूर जिल्ह्यासह कर्नाटकमध्ये कमी पावसाच्या प्रदेशात जातात. आपल्याकडे पावसाचे प्रमाण अधिक आहे. खरीप पेरणीमुळे व चराऊ कुरणे आरक्षित केली जातात. त्यामुळे शेळ्या-मेंढ्या फिरविण्यासाठी जागा नसते. मोठ्या पावसात मेंढ्या दगावण्याची शक्यता असते. त्यामुळेच कमी पावसाच्या प्रदेशात म्हणजे हे मेंढपाळ देशावर किंवा चारणीस जातात.
सध्या कोरोनाच्या संकटावर लॉकडाऊन हाच पर्याय आहे; परंतु लॉकडाऊनच्या काळात मेंढपाळांची आडवाआडवी होऊन अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे. यावेळी राष्ट्रवादी भटक्या विमुक्त जाती संघटना जिल्हा अध्यक्ष कृष्णात पुजारी, दत्तात्रय हजारे, कृष्णात शेळके, बाळासाहेब मोटे, राजेश बाणदार, बाळासाहेब दाईगडे, रंगराव हराळे, के. एस. रानगे उपस्थित होते.