चांगली सेवा द्या, हद्दवाढीसाठी गावे स्वत:हून पुढे येतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:59 AM2021-01-13T04:59:08+5:302021-01-13T04:59:08+5:30
कोल्हापूर : शहरातील नागरिकांना अधिकची चांगली सेवा दिल्यास लगतची गावे स्वत:हून हद्दवाढीसाठी पुढे येतील, असे मत आमदार चंद्रकांत जाधव ...
कोल्हापूर : शहरातील नागरिकांना अधिकची चांगली सेवा दिल्यास लगतची गावे स्वत:हून हद्दवाढीसाठी पुढे येतील, असे मत आमदार चंद्रकांत जाधव यांनी येथे सोमवारी व्यक्त केले. महापालिकेमध्ये आरोग्य विभागातील प्रश्नासंदर्भातील बैठकीत ते बोलत होते. या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी काम नव्हे तर कर्तव्य म्हणून जबाबदारी स्वीकारली व कामाचे सूक्ष्म नियोजन केल्यास आपले कोल्हापूर कायमस्वरूपी ‘स्वच्छ व सुंदर’ राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार जाधव म्हणाले, समृद्ध कोल्हापूरच्या निर्माणासाठी महापालिकेचा आरोग्य घनकचरा विभाग सक्षम पाहिजे. तुंबलेली गटर व साचलेला कचरा या प्रश्नावर नगरसेवकांना महापालिकेत का यावे लागते, हे या विभागाचे अपयश आहे. त्यामुळे या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी चांगले काम केले पाहिजे. शहर स्वच्छतेमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका सफाई कर्मचारी, मुकादम व आरोग्य निरीक्षकांची आहे. अनेक सफाई कर्मचारी वयोवृद्ध झालेत, त्यांना काम जमत नाहीत. त्यांच्या ठिकाणी त्यांच्या घरातील व्यक्तींना संधी द्या. जे कर्मचारी जबाबदारीने काम करत नाहीत त्यांना समज द्या. जे कर्मचारी बदली कामगार कामावर पाठवतात, त्यांच्यावर कारवाई करा.
प्रभागातील कचरा संकलनाचे काम १०० टक्के यशस्वतीरीत्या पार पाडल्यास कचऱ्याची समस्या राहणार नाही. कीटकनाशक फवारणीचे नियोजन करून, दिवस व वेळ निश्चित करावा आणि फवारणी झाल्यानंतर त्या भागातील नागरिकांच्या सह्या कर्मचाऱ्यांनी घ्याव्यात, त्यामुळे नागरिकांची तक्रार राहणार नाही. ड्रेनेज स्वच्छतेसाठी मशिनरीची आवश्यकता असल्यास, त्याचा प्रस्ताव द्या. शासनाकडून निधी आणू. महापालिकेच्या सर्व वाहनांचे ऑडिट करून घ्यावे. कत्तलखाना विभागातून उत्पन्न वाढले पाहिजे, अशी अपेक्षा आमदार जाधव यांनी व्यक्त केली.
चौकट
एसटीपीचे पाणी शेतीसाठी वापरा
कोल्हापूरचे एक थेंबही सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळायला नको, त्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करून, पाणी शेत, बागला देण्याबाबतचा प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करा. हा प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून आणण्याचे आश्वासन आमदार जाधव यांनी दिले.
फोटो : ११०१२०२० कोल आमदार जाधव बैठक
ओळी : कोल्हापूर महापालिकेमध्ये आमदार चंद्रकांत जाधव यांनी सोमवारी आरोग्य विभागासंदर्भात आढावा बैठक घेतली. यावेळी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, डॉ. अशोक पोळ, डॉ. विजय पाटील, जयवंत पोवार आदी.
छाया : नसीर अत्तार