गुऱ्हाळघरांना बारा तास वीज द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2016 12:44 AM2016-10-19T00:44:35+5:302016-10-19T00:44:35+5:30
स्वाभि:मानी संघटना
कोल्हापूर : जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांना सलग बारा तास वीजपुरवठा करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ‘महावितरण’च्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली.
राज्य सरकारने शेतीपंपासाठी सलग बारा तास वीजपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत; पण सध्या कोल्हापूर जिल्ह्यात गुऱ्हाळघरांना आठ तास वीजपुरवठा केला जातो. सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत वीज दिली जाते. या कालावधीत गुऱ्हाळघरे चालविणे अवघड झाले असून याऐवजी सकाळी सात ते सायंकाळी सात अशी सलग बारा तास वीज द्यावी.
शेतीपंपामध्ये आयोगाने वीज बिलात दिलेली सवलत सध्या रद्द करून वाढीव वीज बिले दिलेली आहेत. ती वीज बिले भरणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. यासाठी आयोगाने सवलतीच्या दरात गुऱ्हाळघरांना वीजपुरवठा करावा; अन्यथा गुऱ्हाळमालक व स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन उभे करेल, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी ‘महावितरण’ला दिला. यावेळी श्रीकांत घाटगे, बाबासाहेब पाटील-भुयेकर, विक्रम पाटील, विकास पाटील, संभाजीराव दिंडे, राहुल घोरपडे, आदी उपस्थित होते.